

नगर / सावेडी: तिमिराचा नाश करणारं, जगण्याचं अवघं अवकाश तेजाळून टाकणारं, कलागुणांना प्रोत्साहन देणारं, रसनेला तृप्त करणारं आणि आनंदरंगाच्या उधळणीनं तनामनाला चैतन्य आणणारं दिवाळीचं उत्सवपर्व सुरू झालं. नव्या कपड्यांसह विविध गृहोपयोगी वस्तू आणि अन्य खरेदीसाठी नगरकरांच्या गर्दीने शहरातील बाजारपेठा फुलल्या आहेत. लक्ष्मीपूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची शहरासह उपनगरांतील रस्त्यांवर दुकाने थाटली आहेत.
वर्षातील सर्वांत मोठा सण म्हणून दीपावली पर्वातील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. रविवारी (दि 8) असलेल्या लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याचे विविध स्टॉल शहरातील कापड बाजार, नवी पेठ, गंज बाजार, मोची गल्ली, गांधी मैदान, चौपटी कारंजा, चितळी रोड, टिळक रोड, स्वस्तिक चौक, तसेच सावेडी येथील पाईपलाईन रोड, प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, झोपडी कॅन्टीन, या मुख्य रस्त्यांवर लावले आहेत.
दिवाळीनिमित्त फटाका स्टॉल शहरासह उपनगरात उभारण्यात आली आहेत. रेल्वे पुलाखाली, कायनेटिक चौक, बस स्टँडशेजारी, मार्केट यार्डसमोर, सावेडीतील प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, सावेडी बसस्थानक, तारकपूर, या ठिकाणी फटाक्यांची दुकाने सजली आहेत. सुरसुरी, फुलबाजे, नागगोळी, भुईचक्र, पोंगो, भुईनळे, तसेच लहान मुलांसाठी बनवण्यात आलेले फटाके खरेदीबरोबरच इतर वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.
घरांच्या सजावटीसाठी आकाशकंदील (कंदील), विद्युत रोषणाईच्या विविधरंगी माळा, पणत्या, रांगोळीचे साहित्य आणि फुलांची बाजारात खरेदी सुरू आहे. कापड बाजारात नवीन कपडे, पारंपरिक पोशाख, साड्या व शाळकरी मुलांच्या ड्रेसच्या खरेदीसाठी कापड बाजारात महिला व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
लक्ष्मीमूर्ती 60 ते 600 रुपये
या दुकानांत नवी केरसुणी 80 ते 120, नारळ 35, प्रसाद म्हणून वापरण्यात येणाऱ्या लाह्या-बत्ताशे 20 रुपये, लक्ष्मीमूर्ती 60 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत, बोळके 70 रुपये प्रतिडझन, पणती 30 रुपये ते 50 रुपये डझन, रांगोळी 15 रुपये किलो, लक्ष्मीपूजनला सिंधीच्या झाडापासून बनवलेल्या केरसुणीची पूजा करण्याची परंपरा असल्याने (पाच फड) असलेली केरसुणी 120 ते 150 रुपयांपर्यंत मिळत आहे. मोठी पणती 300 रुपये डझन आहे.
विशेष फेस्टिव्ह ऑफर्स व सवलती
दीवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी, नवीन वाहने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी सुरू आहे. एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन व विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर दुकानदारांकडून विशेष फेस्टिव्ह ऑफर्स व सवलती दिल्या जात आहेत. ज्यामुळे या वस्तूंना मोठी मागणी आहे.
व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
मागील काही दिवसांपासून ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा, सावेडी परिसर, कापड बाजार, तसेच इतर व्यापारी केंद्रांमधील उलाढाल वाढली आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.