

राहुरी: चारचाकी वाहनातून येवून, राहुरी परिसरामध्ये वाहनांमधील डिझेल चोरी करणारी टोळी राहुरी पोलिसांनी शिताफिने जेरबंद केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शखाली तिघांना पकडले, तर पोलिसांच्या हातावर तुरी देत, चारचाकी वाहनासह दोघेजण पसार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (Latest Ahilyanagar News)
11 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी पोलिस स्टेशन हद्दीत चोरटे डिझेल चोरी करण्यासाठी आले आहेत, अशी गुप्त माहिती पोलिस निरीक्षक ठेंगे यांना मिळाली. पोलिस उप निरीक्षक संदीप मुरकुटे, पोलिस नाईक प्रविण अहिरे, पोलिस काँस्टेबल सतीश कुर्हाडे, अंबादास गिते, नदीम शेख व अंकुश भोसले यांच्या पथकाने संशयितांवर अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर सापळा रचला.
यावेळी शहरातील पाण्याच्या टाकीजवळ तिघेजण संशयितरित्या फिरत असल्याचे पाहून, पोलिसांनी त्यांना विचारपूस केली, परंतू त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यांच्या अंगातून पेट्रोल सदृष्य वास आल्यामुळे पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पळ काढला, परंतू पोलिसांनी शिताफीने पाठलाग करुन, तिघांना जेरबंद करुन, राहुरी पोलिस ठाण्यात आणले. अजय सोमनाथ मोगले (21, रा. चारी नं. 15 रांजणगाव रोड, राहाता), यश सुनिल जाधव (21 रा. विशाल नगर, जेऊर पाटोदा, ता. कोपरगाव) व एक अल्पवयीन मुलगा असे आरोपी निष्पन्न झाले.
पोलिसांनी खाक्या दाखविताच चोरट्यांनी चोरट्या सवंगड्यांची नावे सांगितली. शेखर शिंदे (रा. शिबलापूर- पानवडी, ता. संगमनेर) तात्या ऊर्फ शेखर अमोलिक (रा. राहाता) यांनी इंडिका कारमध्ये प्लॅस्टिक ड्रम, नळी, लोखंडी टॉमी व चाकूचा धाक दाखवून, अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर एकाला लुटल्याचे पोलिसांना समजले. दरम्यान, पकडलेल्या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता, दोघांना पोलिस कोठडी तर, अल्पवयीन युवकाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मुरकुटे, पोलिस हेड काँस्टेबल सूरज गायकवाड, राहुल यादव, पोलिस नाईक प्रविण अहिरे, रोकडे, सतीश कुर्हाडे, प्रमोद ढाकणे, अंबादास गिते, नदीम शेख, अंकुश भोसले, सचिन ताजणे, सायबर सेलचे उत्तर विभागाचे पोलिस नाईक सचिन धनाड, संतोष दरेकर, रामेश्वर वेताळ यांच्या पथकाने यशस्वी केली.