

नगर: लोकसभा निवडणुकीनंतर मतदान यंत्रांविरोधात ओरड झाली नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांची यंत्रांबाबत (ईव्हीएम) ओरड सुरु झाली. ही विरोधकांची ओरड संशयास्पद आहे.
मतचोरीबाबत विरोधक निवडणूक यंत्रणेला पुरावा देत नाहीत. मात्र, जाहीररित्या नुसतेच आरोप करीत सुटले आहेत. महायुती सरकारचे दोष काढणे अवघड जात असल्यामुळे विरोधक मतचोरीच्या नावाखाली जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत, अशी टीका भाजपचे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी केली आहे. (Latest Ahilyanagar News)
स्वातंत्र्य दिनाच्या (15 ऑगस्ट) पूर्वसंध्येला गुरुवारी आमदार पाचपुते यांनी अहिल्यानगर येथील पुढारी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आवृत्ती प्रमुख संदीप रोडे यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यातील पाऊसपाणी, धरणांची परिस्थिती, विधीमंडळ अधिवेशनातील कामकाज, ईव्हीएम आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपाचे आगामी निवडणुकीतील रणनीती आदी विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या.
आमदार पाचपुते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मतचोरीबाबत विरोधकांकडून जनतेतभ्रम निर्माण केला जात आहे. मतदारनोंदणी झाल्यानंतर मतदारयादीबाबत कोणत्याही राजकीय पक्षांकडून हरकती व सूचना आदीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. एकट्या निवडणूक आयोगाला दोषी ठरविणे योग्य नाही.
मतचोरीबाबत पुरावे देण्याऐवजी फक्त आरोप सुरु आहेत. या प्रश्नांवरुन विरोधकांना फक्त जनतेत संभ्रम निर्माण करावयाचा आहे. राजकारणात एक तर विश्वास निर्माण करा अन्यथा भ्रम निर्माण करा हे चालते. त्यानुसार विरोधक मतचोरीचा मुद्दा उपस्थित करुन जनतेत भ्रम निर्माण करीत आहेत. सध्या तरी मानसिकस्थिती विचलीत (सेेन्टीमेन्ट डिस्टर्ब) करणे हेच एकमेव विरोधकांचे उदिृष्ट ठरले आहे. अशी टीका आमदार पाचपुते यांनी विरोधकांवर केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप ताकदीने लढणार आहे. निवडणुका स्वबळावर की महायुती करुन याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील. मात्र, स्थानिक आमदारांना विचारात घ्यावेच लागणार आहे.
आम्ही आमची बाजू मांडणार पक्षश्रेष्ठीपुढे मांडणारच आहोत. आगामी निवडणुकीत भाजप मोठा पक्ष आहे सिद्धच होणार असल्याचा आत्मविश्वास आमदार पाचपुते यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीमध्ये अनेकांची इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे ताकद वाढत आहे. त्यातून भाजप पक्ष भक्कम होत असल्याचे दिसून येत असल्याचे आमदार पाचपुते यांनी आवर्जून सांगितले. मुख्य उपसंपादक दीपक रोकडे, वरिष्ठ उपसंपादक दीपक ओहोळ, ज्ञानेश्वर निमसे यांच्यासह संपादकीय सहकार्यांच्या प्रश्नांना आमदार पाचपुते यांनी मनमोकळ्यापणाने उत्तरे दिली.
तक्रारदारांनो, पुढे या..
आर्थिक गुन्ह्यांचा तपास पोलिस ठाणेदाराच्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा आहे. तपास झाला पाहिजे. परंतु तक्रार करण्यास कोणी पुढे येत नाहीत. गेल्या दोत तीन वर्षांपासून शासन जाहिरात करीत आहेत. एवढे माहित असून देखील लोक उड्या मारत आहेत. वेळ निघून गेल्यावर लोक जागे होतात. पण पुढे काही होत नाही. शासन आणि प्रशासनाची बदलाची तयारी आहे. परंतु आपली मानसिकता नाही. लोकप्रतिनिधींनी ती पुढे आणली पाहिजे. आपण व्यक्तीविरोधात नसून प्रवृत्तीविरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बोगद्याशिवाय पाणी येणे शक्य नाही
श्रीगोंदा तालुक्यात पाऊस भरपूर झाला आहे. त्यामुळे धरणे, तलाव जवळपास भरली आहेत. साखळाई धरण झाले तरच श्रीगोंदा तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा सुटला जाणार आहे. साखळाई धरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. दोन अडीच वर्षांत साखळाईचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डिंभे, माणिकडोह धरणांतून कुकडी प्रल्पात 6.21 टीएमसी पाणी एक्षित आहे. डिंभे धरण क्षेत्रातील लोकांच्या म्हणण्यानुसार पाणी कालव्याने जाऊ द्या. परंतु कालव्याव्दारे 6.21 टीएमसी पाणी येणे अशक्य आहे. हे पाणी बोगद्याशिवाय येऊच शकत नाही. हे सिध्द झाले असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले.
मकोकाबाबत शासनपातळीवर अभ्यास सुरु
दुध, अन्न भेसळ मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कडक कायदा झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. भेसळ करणार्याविरोधात मकोका लागला पाहिजे. ही मागणी अधिवेशनात केली होती. त्यानुसार मकोका लावण्याबाबत शासनपातळीवर अभ्यास सुरु असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले.