

Three drivers robbed in one night
नगर तालुका: नगर-पुणे महामार्गावर चास (ता.नगर) घाटात 13 ऑगस्टला रात्री लुटारूंनी चांगलाच धुमाकूळ घातला. एकाच ठिकाणी काही वेळाच्या अंतराने 3 वाहनचालकांना मारहाण करून लुटले आहे. यात एक रिक्षाचालक, पिकअपचालक व त्याच्या समवेत असलेला शेतकरी आणि एका मारुती ओमनी चालकाचा समावेश आहे. चौघांच्या टोळीने अगोदर दगड फेकून वाहने थांबविली, नंतर वाहनचालकांना रस्त्याच्या खाली ओढत नेत लाकडी दांडक्याने मारहाण करीत लुटले आहे.
याबाबत सचिन रामहरी जाधव (वय 29, रा. नांदूरघाट, ता. केज, जि.बीड, हल्ली रा. पुणे) या रिक्षाचालकाने फिर्याद दिली. फिर्यादी हे पुणे शहरात रिक्षा चालवितात. नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनासाठी ते 11 ऑगस्ट रोजी रिक्षाने त्यांच्या नांदूरघाट गावी गेले होते. तेथून 13 ऑगस्ट रोजी दुपारी ते पुण्याकडे जाण्यासाठी निघाले. रात्री 8 वाजता चासच्या पुढे घाटात गेल्यावर त्यांच्या रिक्षाला कोणीतरी दगड फेकून मारला.
त्यामुळे त्यांनी रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबविली. त्यावेळी अचानक तोंडाला फडके बांधलेले चौघे तेथे आले. त्यांनी फिर्यादी जाधव यांना रिक्षातून खाली ओढत मारहाण सुरु केली. नंतर रस्त्याच्या खाली ओढत गेले. तेथे त्यांच्या खिशातील 5 हजारांची रोकड व कानातील 6 हजार रुपये किंमतीची सोन्याची बाळी काढून घेतली.
तसेच आरडाओरडा केल्या, येथेच जीवे मारू, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या जाधव यांनी रिक्षा घाटाच्या वर गेल्यावर एका हॉटेलजवळ थांबून तेथील नागरिकांना माहिती दिली. तसेच त्यांच्या मदतीने डायल 112 वर कॉल करून पोलिसांना कळविले.
रिक्षाचालक जाधव हॉटेलवर थोडावेळ थांबल्यानंतर याबाबत फिर्याद देण्यासाठी नगरकडे येवू लागले. तेव्हा त्यांना त्याच लुटमारीच्या ठिकाणी एक पिकअप उभी दिसली. तिच्याजवळ दोघे उभे होते. जाधव यांनी त्यांना विचारले असता, पिकअप चालक धुळाजी मारुती भिसे (रा. पिंपरी घाट, ता. आष्टी, जि. बीड) याने सांगितले की मी व सोबतेच शेतकरी राजू तुकाराम हाके (रा.दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे आम्ही दोघे त्यांच्या शेतातील डाळिंब घेऊन पुण्याच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी चाललो आहोत.
या ठिकाणी पिकअपला दगड मारल्याचा आवाज आल्याने आम्ही पिकअप थांबविली. अंधारातून 3-4 जण आले व त्यांनी आम्हा दोघांना मारहाण केली. तसेच रस्त्याखाली ओढत नेऊन धुळाजी भिसे यांच्या खिशातील 33 हजार 300 रुपयांची रोकड, 15 हजारांचा मोबाईल, राजू हाके यांच्या खिशातील 5 हजारांची रोकड, त्यांच्या कानातील 8 हजार रुपये किंमतीची सोन्याची बाळी, 20 हजार रुपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी असा ऐवज काढून घेत राजू हाके यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
त्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाल्याचे सांगितले. आम्ही सुप्यात औषधोपचार घेऊन पोलिस ठाण्यात येतो, असे सांगितले. त्यानंतर सचिन जाधव नगर तालुका पोलिस ठाण्यात गेले. तेथे फिर्याद देत असताना धुळाजी भिसे, राजू हाके आले. त्यानंतर आणखी एक मारुती ओमनी चालक बाळासाहेब सीताराम साळवे आणि त्यांच्या सोबतच्या एका व्यक्तीला अशाच पद्धतीने लुटले.