

नेवासा: श्रीक्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पीठाचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे यांचे रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने देवगड परिसरासह संपूर्ण भक्तपरिवारावर शोककळा पसरली आहे.
वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात ह.भ.प. भास्करगिरी महाराज, मधुकर पेसोडे हे दोन पुत्र तसेच कमलबाई रायपुरे ही कन्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी दुपारी ४.३० वाजता श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
देवगडसारख्या भव्य आणि श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भास्करगिरी महाराज हे वारकरी संप्रदायातील एक प्रभावी, प्रेरणादायी आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण राज्यभर ओळखले जातात.
त्यांच्या या आध्यात्मिक वाटचालीमागे मातोश्री सरुबाई यांचे संस्कार, त्याग आणि आशीर्वाद यांचा मोठा वाटा होता. साधी राहणी, भक्तीमय जीवन आणि कुटुंबातील सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वासाठी आदर्श होते.
मातृछत्र हरपल्याने भास्करगिरी महाराजांसह संपूर्ण पेसोडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, देवगड परिसरातील भाविक, वारकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.