

नाशिक : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. महायुती म्हणून एकत्र लढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ महसूलमंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाकून एकत्र लढण्याबाबतचे सूतोवाच आहे. त्यामुळे महायुती एकत्र लढणार असल्याचे निश्चित मानले जात असताना दुसरीकडे मात्र, महाविकास आघाडीचे अद्याप निश्चित नसल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आल्यानंतर लवकरच या निवडणुका होणार, हे निश्चित मानले जात आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढविण्याबाबत स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आग्रही आहेत. त्याबाबत त्यांनी घोषणादेखील केलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील एकत्र लढविण्याबाबत सहमती दर्शविली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाशिकमध्ये महायुती म्हणून निवणुक लढविणार असल्याचे सांगितले. भाजप असो की, शिंदे शिवसेना तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिघांकडून स्थानिक पातळीवर सभा, बैठका सुरू झाल्या आहेत. यातून कार्यकर्त्यांना चार्ज केले जात आहे. त्यामुळे महायुतीत निवडणूक लढविण्याबाबत हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे सूत काही जमेना अशी स्थिती दिसत आहे. उद्धव ठाकरे शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून एकत्र लढण्याबाबत कोठेही हालचाली नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यातच ठाकरे बंधू व तिकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी होणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थितीत होत आहे. तिन्ही पक्षांकडून एकत्र लढण्याबाबत स्पष्टता नसल्याने नेमके कराय़चे काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणुकीसंदर्भातील तयारीचा आढावा घेतला. त्यांनी दि. १० जूनला पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले. पक्ष संघटनेत होणाऱ्या बदलांसाठी सर्वांनी तयार राहावे अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील स्थानिकच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की, स्वतंत्र यासंदर्भात १० जूनला ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षाची भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी चर्चा करा. ते सोबत आले, तर ठिक आहे, नाही आले, तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. निवडणुकांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्या अशा सूचनाही त्यांनी केली.