

वळण: राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस गेल्या पाच- सहा दिवसांपासून अधून- मधून बरसत आहे. खरीप पेरणीसाठी शेतीची मशागत करून, तयारीत असलेल्या शेतकर्यांनी अल्प ओलीवरचं कपाशी लागवडीचा श्रीगणेशा केल्याचे चित्र दिसत आहे. पुढे वेळेत पाऊस होतो की नाही, याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकर्यांनी सध्याच्या ओलीवरचं कपाशी लागवड सुरु केली आहे. एकेकाळी ‘उसाचा बागायत पट्टा,’ अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात आता मात्र प्रतिवर्षी कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसत आहे. (Ahilyanagar News Update)
मागील आठवड्यापासून राहुरी तालुक्यात विशेषतः पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, पिंपरी वळण, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, वळण पिंपरी, चंडकापूर, कोंढवड, शिलेगाव, मांजरी, तिळापूर, वांजुळपोई, पाथरे, खुडसरगाव व माहेगाव भागात दररोज अधून- मधून पावसाच्या लहान-मोठ्या सरी वादळी वार्यासह बरसत आहेत. बर्यापैकी शेतात ओल झाली आहे. बहुतांश शेतकर्यांनी अगोदरच लागवडीसाठी कपाशी बियाणे खरेदी केले आहे. अनेकजण सध्या कृषी सेवा केंद्रांकडे इच्छित बियाणे खरेदी करताना दिसत आहेत. सध्या 70 67, राशी 971, कबड्डी, जय हो आदी बियाणांची लागवड शेतकरी करताना दिसतात. सुमारे 20 ते 25 व्हरायटी असल्याने शेतकर्यांची ही द्विधा मनस्थिती होत आहे.
एकरी दोन किलो बियाणे 1, 800 रुपये नांगरट, 2500 रुपये रोटा, 2 हजार, 1,500 रुपये, असा खर्च सध्या लागवडीसाठी करण्यात येत आहे. शेतकर्यांनी बि- बियाणे, खते व औषधे अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. खरेदी करताना पक्के बिले घ्यावे.
बि- बियाणे, खते व औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरावर कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. शेतकर्यांची फसवणूक झाल्यास, तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकार्यांशी संपर्क साधावा.
विना परवाना खते, औषधे व बि- बियाणे जादा दराने विक्री करणार्यांविरुद्ध कृषी विभागाने थेट कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. शेतकर्यांनी परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.