

Unseasonal Rain in Ahilyanagar:
नगर: उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरसह राहुरी, राहाता, संगमनेर, कोपरगाव व अकोले तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. वादळ-वार्यासह पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संततधार पावसाने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक अक्षरशः अहवालदिल झाला आहे. हा पाऊस उघडणार, तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, ‘अवकाळी’ने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून, नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे.
संगमनेरः संगमनेर तालुक्यात गेल्या दहा- बारा दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संततधार पावसाने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक अहवालदिल झाला आहे. पाऊस कधी उघडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून, नुकसान भरपाई द्या, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील विविध भागात ‘अवकाळी’ने दमदार हजेरी लावली. यामुळे टँकर सुरू असलेल्या गावांमध्ये सध्या टँकर मागणीला ब्रेक लागला आहे. तालुक्यातील धांदरफळ, निमज, निमगाव भोजापूर, समनापूर, चंदनापुरी , आश्वी, घुलेवाडी, तळेगाव,देवकौठे, तर पठार भागातील अनेक गावात ‘अवकाळी’ने हजेरी लावली आहे. काही भागात गेल्या दहा-बारा दिवसांपासून ‘अवकाळी’बरसत आहे. गेल्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या ‘अवकाळी’ने तालुक्यात अनेक भागात पिकांचे मोठे नुकसान केले. शेतात पाणी साठून कांदा, टोमॅटो, वांगे, भाजीपाला, डाळिंब बागांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागात पावसाचा चांगलाच फटका पिकांना बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यंदा मे महिन्यातच ‘अवकाळी’ने दमदार हजेरी लावल्याने पाण्याचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे. सध्या काही भागात नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. आमदार अमोल खताळ यांनी पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या, तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पंचनामे करावेत, अशी मागणी केली होती. शुक्रवार- शनिवार असे सलग दोन दिवस ‘अवकाळी’ने अनेक भागात हजेरी लावली. कृषी विभागाकडून मात्र पंचनामे करण्यात टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप काही शेतकर्यांनी केला आहे. तालुका कृषी अधिकार्यांनी, सध्यातरी पंचनामे करण्यासारखे नुकसान झाले नाही, असे सांगितले होते, मात्र आमदार खताळ यांनी, कान उघडणी करताच पंचनामे सुरू करण्यात आले. तहसीलदार, कृषी व पंचायत समिती प्रशासन सध्या ‘अवकाळी’वर नजर ठेवून आहे.
संगमनेर शहरात ‘अवकाळी’ने गटारी तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले आहे. शहरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कचरा न उचलल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. शहराला अक्षरशः बकाल स्वरूप आले आहे. शहरातील मुख्य नवीन नगर रोड, बस स्थानक परिसर, मालदाड रोड, लिंक रोड, शिवाजी महाराज पुतळा यासर्व महत्त्वाच्या ठिकाणी पाणी साठत आहे. नागरिकांसह व्यवसायिकांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एकूणच ‘अवकाळी’ने संगमनेर शहरासह तालुक्यात अक्षरशः थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत.
‘संगमनेर शहरासह तालुक्यात रविवारी (दि.25) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडांसह अवकाळी पावसाने दमदार बॅटींग केली. पावसामुळे एकिकडे हवेत गारवा निर्माण झाला, तर दुसरीकडे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. संततधार पावसामुळे शेतीसह घरची कामे करणे अवघड झाले आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मान्सून पूर्व पावसाने मोठा कहर केल्याने जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने काय होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.