

नगर तालुका : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असणार्या इमामपूर घाटामध्ये मंगळवारी (दि.16) रोजी रात्री मोठी दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये वित्त अथवा जिवित हानी झाली नाही. परंतु दरड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. (Latest Ahilyanagar News)
छत्रपती संभाजीनगर महामार्ग ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासासाठी खूपच धोकादायक बनलेला आहे. त्यातच मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून वळविण्यात आल्याने रहदारी वाढली आहे. मोठे-मोठे खड्डे अन वाढलेली रहदारी यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याचे पाहावयास मिळते. त्यातच मंगळवारी रात्री इमामपूर घाटामध्ये दरड कोसळल्याने एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता.
इमामपूर घाटात दरड कोसळल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. घाटामध्ये वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती. घटनेची माहिती समजतात एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे व कर्मचार्यांनी घटनास्थळी जात वाहतूक सुरळीत केली. संबंधित विभागाला संपर्क साधून महामार्गावरील दगड माती बाजूला घेत महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे महामार्गावर होणार्या वाहतुकीची कोंडी टळल्याने पोलिसांच्या नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
इमामपूर घाट परिसरात अनेक कडा ढासळण्याच्या स्थितीत आहेत. भविष्यात येथे दुर्घटना घडू शकते. दगड, माती रस्त्यावर पडू नये, यासाठी सुमारे वीस वर्षांपूर्वी डोंगर कपार्यांना जाळी मारण्यात आली होती. परंतु मंगळवारी जाळीसह मोठ्या प्रमाणात दगड व माती महामार्गावरच कोसळली. घाटामध्ये विविध कडा ढासळण्याच्या मार्गावर आहे. घाटातून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. घाटामध्ये सर्वत्र मोठ मोठाले खड्डे पडलेले आहे. वाहनांचा वेग देखील खूपच कमी असतो. अशावेळी दरड कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
घाट परिसरात पाहणी करून धोकादायक कडा, कपारी काढून घेण्याची मागणी भीमराज आवारे, सादिक दारूवाले, शशिकांत ईपरकर, शिशुपाल मोकाटे, उल्हास जरे, मच्छिंद्र आवारे, मायकल पाटोळे, प्रतीक तोडमल, आकाश तोडमल, शंकर तवले, बाप्पू तोडमल, सुरज तोडमल, सनी गायकवाड, स्वप्निल तवले यांच्यासह नागरिकांमधून होत आहे.
छत्रपती संभाजीनगर महामार्गाची झालेली दुरवस्था बघता येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. महामार्ग नव्याने बनविण्याची गरज आहे. खराब झालेल्या महामार्गावर मनमाड मार्गावरील वाहनांचा ’लोड’ देण्यात आल्याने समस्यांमध्ये भरच पडल्याचे इमामपूरचे सामाजिक कार्यकर्ते भीमराज आवारे यांनी सांगितले.
महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अपघातात निष्पापांचे बळी जात आहेत. काहींना कायमचे अपंगत्व येत आहे. वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. महामार्गावरील खड्डे पाहता टोलनाका बरा पण महामार्ग चांगला असणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
-सादिक दारुवाले, वाहनचालक