

पारनेर: नगर जिल्ह्यासह राज्यभर बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गंभीर विषयाची वेळोवेळी संसदेत तसेच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणारे खासदार नीलेश लंके यांना मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाला तातडीने अंमलबाजावणी निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात पाठपुरावा करताना खा. लंके यांनी मंत्री भूपेंद्र यादव यांना निवेदन सादर केले होते. त्यात नगर जिल्ह्यासह राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक शेतकरी, महिला, लहान मुले या हल्ल्यांना बळी पडले आहेत. (Latest Ahilyanagar News)
ग्रामीण भागात भीतीचे सावट पसरले आहे. या पार्श्वभूमिवर संवेदनशील भागांत त्वरित संरक्षण यंत्रणा उभारणे, पथके तैनात करणे आणि पीडीत कुटुंबांना तत्काळ मदत मिळावी, अशा मागण्या खा. लंके यांनी केल्या होत्या.
संवेदशील भागांची ओळख पटवावी. बिबट्याच्या सतत वावरामुळे उच्च धोका निर्माण झालेल्या गावांची यादी तातडीने तयार करावी. त्वरित प्रतिसाद पथके तैनात करावीत. प्रशिक्षित वन कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकार्यांचा समावेश असलेली प्रतिसाद पथके तयार करून बिबटया हल्ल्यांना प्रतिसाद देणे अनिवार्य करावे. केंद्रीय मानक कार्यपद्धदतीचे पालन करावे आदी निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहेत.
दिरंगाई सहन करणार नाही
खासदार लंके यांनी केंद्रीय मंत्रयांच्या या ठोस हस्तक्षेपाचे स्वागत करत राज्य शासनाने सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. ग्रामीण जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. वन विभागाने स्थानिक पातळीवर जागरूकता वाढवून अधिक सजग आणि जबाबदार भूमिका घ्यावी, अशी मागमी खासदार लके यांनी केली.