

शशिकांत पवार
नगर: महापालिका निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच, असा ठाम निर्धार करत भानुदास कोतकर यांनी केडगावात राजकीय डाव मांडला खरा; पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदतीच्या काही तास आधीच त्यांचा डाव मोडला! शिवसेनेची उमेदवारी नाकारण्यासोबतच कोतकर महापालिकेच्या राजकीय पटावरून बाजूला गेले. कोतकरांच्या अचानक माघारीने इच्छुक उमेदवारांसोबतच अवघे नगर अंचबित झाले.
भानुदास कोतकर यांनी केडगावातील प्रभाग 16 आणि 17 मधील आठ जागांवर समर्थकांना उमेदवारी देत निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्का केला. इच्छुक समर्थकांना भाजपच्या मुलाखतीला पाठविले; मात्र कोतकर समर्थकांच्या उमेदवारीविरोधात केडगावातील भाजप निष्ठावंत पेटून उठला. परिणामी भाजपने कोतकर समर्थकांच्या उमेदवारीला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कोतकर यांनी आठ उमेदवार निश्चित करत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि प्रचाराचे नारळही फोडले. समर्थकांनी झपाटल्यागत प्रचार सुरू केला. दरम्यानच्या काळात राजकीय घडामोडी वेगवान होत गेल्या.
महायुतीतून शिवसेना बाहेर पडताच कोतकर शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. सेनेनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. सोमवारी सायंकाळी शिवसेनेकडून कोतकरांना सहा जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोतकर समर्थकांना शिवसेनेची उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांचे पाठबळ वाढणार होते. दोघांत दिलजमाई करण्याचा प्रयत्नही सुरू झाला. कोतकर समर्थकांना शिवसेनेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवत जिल्हाप्रमुख अनिल शिंदे सकाळीच एबी फॉर्म घेऊन केडगावात दाखल झाले. मात्र ऐनवेळी भानुदास कोतकर यांनी समर्थकांना शिवसेनेची उमेदवारी न करण्याचा निर्णय कळविला. कोतकरांच्या ऐनवेळच्या नकाराने शिवसेनेचे नेते गेले तसेच केडगावातून माघारी परतले. त्यामुळे केडगावात ऐनवेळी उमेदवार शोधताना दिलीप सातपुते यांची धावपळ उडाली. राखीव जागेवर नवीन चेहरा देतानाच उबाठा सेना आणि भाजपने डावलेल्यांना शिवसेनेची उमेदवारी देण्याची वेळ त्यांच्यावर आली.
भानुदास कोतकर यांचा निर्णय त्यांच्या समर्थक इच्छुकांसाठी अंतिम होता. शिवसेनेची उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून समर्थकांनी अर्ज भरण्यास सुरुवातही केली; मात्र ऐनवेळी कोतकर यांनी शिवसेनेला नकार कळविला. कोतकरांचा हा निर्णय समर्थक इच्छुकांसाठी धक्कादायक मानला जातो. कोतकरांनी महापालिका निवडणुकीतून माघार का घेतली? याचे कारण मात्र समोर येऊ शकले नाही. आता कोतकर समर्थकांची महापालिका निवडणुकीत काय भूमिका असेल? हे येणारा काळच सांगेल. तूर्तास कोतकर मात्र महापालिकेच्या मैदानातून बाहेर गेले, असेच म्हणावे लागेल.
लोणीतून सूत्रे हलली!
भानुदास कोतकर मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला पोहचले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे-कोतकरांची बैठक झाली. याच बैठकीतून मंत्री विखे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. मुख्यमंत्री फडणवीस आणि कोतकर यांच्यात संवाद घडवून आणला गेला. त्यानंतर कोतकर यांनी शिवसेनेची उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.