

अकोलेः अकोले शहरात उघडकीस आलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतचं आहे. दरम्यान, अकोलेतील हनी ट्रॅपमध्ये अडकलेली सिन्नर येथील खंडणीखोर प्राजक्ता, तिला मदत करणाऱ्या कविता व छाया या तिघींविरोधात अकोले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी तकारींचा ओघ वाढण्याची शक्यता आहे, परंतु काहीजण शिकार होऊनही सांगायचं कसं..? अशा यक्षप्रश्नात गुरफटले आहेत. बहुतांश जण बदनामी नको, म्हणून तोंडावर बोट ठेवून गप्प बसल्याची चर्चा आहे.
अकोलेतील हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या तिघींनी पैशासाठी ‘हनी ट्रॅप’ ही भन्नाट शक्कल लढविली. तरुणांसोबत ओळख वाढवायची, प्रेमाचे नाटक करायचे, नंतर ब्लॅकमेल करून, त्यांना खंडणी मागायची. रक्कम न दिल्यास पोलिसात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याची धमकी देत, साथीदारांकरवी मारहाण करून, व्हिडिओ काढायचा, अशी गुन्ह्याची अनोखी पध्दत वापरून, प्राजक्ता हिने गंडविल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. (Latest Ahilyanagar News)
संगमनेरातील कामगार तरुणाला तिने जाळ्यात अडकविल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, तिने काही राजकीय पदाधिकाऱ्यांसह नोकरदारांनाही गळ लावला होता. यापैकी काहीजण शिकार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, मात्र बदनामी होण्याची भिती वाटत असल्यामुळे काहीजण पोलिसात तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. तिच्या जाळ्यात अडकलेल्यांची यादी मोठी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘तरुणांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून, खंडणी उकळणाऱ्या प्राजक्ता या महिलेला रक्कम घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले. दरम्यान, खंडणीखोर प्राजक्ताला मदत करणाऱ्या कविता व छाया या तीन महिलांविरोधात अकोले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
‘हनी ट्रॅप’ प्रकरणाबाबत दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती घेतली जात आहे, परंतु खोट्या प्रेमाचे जाळे टाकून व्हिडिओ काढून, तो व्हायरल करण्याच्या नावाखाली तरुणांकडून रक्कम उकळण्याच्या गैरप्रकाराबाबत अकोले पोलिसांशी संपर्क साधावा. संबंधित पिडित पुरुषाचे नाव गुपित ठेवण्यात येईल. -मोहन बोरसे, पोलिस निरीक्षक, अकोले.