जुन्यातील चार वार्डांची तोडफोड केल्यानंतर जोडाजोडीत नव्या रचनेत या नव्या 5 नंबर वार्डाची रचना झालेली दिसून येते. त्यामुळे जुन्या वार्डातील तेच ते जुने चेहरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार की राजकीय पक्ष त्यांना बाजूला सारत नव्या चेहऱ्यांना संधी देणार, हे पाहण्यासाठी काही काळ थांबावे लागेल.
या नव्या वार्डात महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीचे पारडे वरकरणी जड वाटत असले तरी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनीही याच वार्डातून मोर्चेबांधणी सुरू केल्याने लढत चुरशीची होईल, असे चित्र पुढे येऊ पाहत आहे. (Latest Ahilyanagar News)
माजी नगरसेवक सचिन जाधव, मुदस्सर शेख, जसपाल पंजाबी, अक्षय उनवणे, दीप चव्हाण, सुप्रिया धनंजय जाधव, अनिल बोरुडे, अजिंक्य बोरकर, योगीराज गाडे, ज्योती गाडे यांच्या जुन्या वार्डाची तोडफोड झाल्यानंतर हा नवीन पाच नंबरचा वार्ड निर्माण झाला आहे. या वार्डाची नवी रचना पाहता तारकपूर, सिद्धार्थनगर, गोविंदपुरा, कराचीवाला नगर, गोकुळवाडी आणि प्रकाशपूर हा भाग निर्णायक भूमिका बजावणार आहे.
त्यामुळे या भागातून उमेदवारी देताना राजकीय पक्षांनाही समतोल राखावा लागणार आहे. समतोल बिघडला की विजयाचे गणित विस्कटलेच म्हणून समजावे लागेल. महायुतीकडे विशेषत: राष्ट्रवादीकडे या वार्डातूनही भरपूर इच्छुक आहेत. जीतू गंभीर यांनीही या वार्डातून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्या जुन्या वार्डातील बहुतांश भाग नव्या तीन नंबर वार्डात आला असला, तरी तेही या भागातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविली जाते. मात्र बोरकर यांना तीन की पाच नंबर वार्डातून मैदानात उतरवायचे याचा सर्वस्वी निर्णय पक्ष अर्थात आ. संग्राम जगताप हेच घेणार आहेत.
त्यामुळे बोरकर दोन्ही वार्डांच्या संपर्कात असल्याचे दिसते. याच सोबत माजी नगरसेवक संजय गाडे हेही याच वार्डातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांचा पक्ष कोणता, हे मात्र अजून ठरलेले नाही. अपक्ष निवडून आल्यानंतर संजय गाडे यांनी सलग तीन वर्षे स्थायी समितीचे सभापतिपद भूषवत महापालिकेत विक्रम केला होता. आता ते निवडणूक लढणार असले तरी अपक्ष लढण्याच्या फंदाच न पडता पक्षाचा सहारा घेण्याची तयारी करत असल्याचे दिसते. आ. संग्राम जगताप, आ. शिवाजी कर्डिले यांच्याशी असलेले सख्य आणि नातेसंबंध हे संजय गाडे यांच्या पथ्यावर पडणार का? याची उत्सुकता आहे.
अक्षय उनवणे आणि मुदस्सर शेख यांनी गतवेळी बसपाच्या हत्तीवर स्वार होत निवडणूक लढवत विजय मिळविला होता. यंदा ते पुन्हा हत्तीवर स्वार होणार की नव्या पक्षाच्या आश्रयाला जाणार हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. मात्र दोघेही निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. याशिवाय पुतण्या झहीर यालाही मुदस्सर शेख रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत.
राष्ट्रवादीकडून जय भोसले हेही निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यांच्याच घरात गतवेळी नगरसेवकपद होते. आता ते स्वत: लढण्याची तयारी करत असले तरी आरक्षण कसे पडणार यावर त्यांचा निर्णय अवलंबून आहे. रामवाडीतून आढांगळे आणि भाऊसाहेब उडाणशिवे यांचीही नावे अधूनमधून चर्चेत येत आहेत. आता उमेदवारी नेमकी कोणाला अन् कोणत्या पक्षाकडून मिळणार, यावरच आगामी रणनीती ठरणार आहे. ही रणनीती आरक्षण जाहीर झाल्यानंतरच आखली जाईल, असे चित्र आहे.
आ. जगताप पॉवरफुल्ल
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची बाजू या वार्डात भक्कमपणे दिसून येते. तुलनेत भाजपचे फारसे प्राबल्य या वार्डात दिसत नाही. महायुती एकत्रित लढली तरी भाजप या वार्डातील दावेदारी कायम ठेवून काही नवखे किंवा जुन्या चेहऱ्यांची आयात करून सत्तेच्या गणितात बेरजेचे राजकारण करेल, अशी शक्यता वर्तविली जाते. अर्थात जगताप-विखे मैत्रीपर्व पाहता ते एकत्रितपणे बसून या वार्डाचा गुंता सोडवतील, असे दिसते.
गतवेळचा कित्ता की चुकीची सुधारणा?
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद मिळाल्यानंतर दीप चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे. त्यांचा जुना वार्ड तुटल्याने ते नव्या पाच किंवा दहा नंबर वार्डातून निवडणूक लढवतील, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. गत पंचवार्षिकला दीप चव्हाण आणि त्यांच्या पत्नी शीला चव्हाण दोघेही निवडणूक लढले होते. त्यात पत्नीचा विजय झाला तर दीप चव्हाण यांचा पराभव झाला होता. आता चव्हाण पुन्हा गेल्या निवडणुकीचा कित्ता गिरवणार की झालेली चूक सुधारून दुसऱ्याला संधी देणार, हे पाहण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.