नगर: विधानसभेत ‘रमी’मुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वत्र वाढू लागल्याने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाकरी फिरवण्याचा मनोदय व्यक्त केल्याने कोकाटे यांच्या जागी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या रविवारच्या (दि. 27) अहिल्यानगर जिल्हा दौर्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात बसून रमी खेळण्यात मग्न असल्याची चित्रफीत व्हायरल झाली आणि ठिकठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आंदोलने सुरू झाली. (Latest Ahilyanagar News)
विरोधकांनी टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. त्याबाबत पक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत सोमवारी-मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. तत्पूर्वी आज (रविवार दिनांक 27) अजित पवार जिल्हा दौर्यावर येत असून त्यांनी भाकरी फिरवायचा निर्णय घेतला तर... नवी शक्यता निर्माण होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगावला मंत्रिपद मिळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
नाशिक जिल्ह्याला एकूण चार मंत्रिपदे देण्यात आली आहेत. याउलट अहिल्यानगर जिल्ह्याला केवळ एक मंत्रिपद असून, तेदेखील भाजपकडे आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. यापूर्वी अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. सहकारी साखर कारखानदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमूळे घट्ट रोवायचे असतील, तर राष्ट्रवादीचा मंत्री होणे गरजेचे आहे. त्यामुळे जर अहिल्यानगर जिल्ह्याला अजित पवार मंत्रिपद देणार असतील, तर यामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी संपूर्ण जिल्हाभरातून पुढे येत आहे.
आ. काळे राज्यात क्रमांक पाचच्या मताधिक्याने निवडून आले असून जिल्ह्यातील त्यांचे मताधिक्य नंबर एकचे आहे. राज्यासह जिल्ह्यात प्रगतिपथावर असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत.
स्वतः उच्चशिक्षित असून शांत, संयमी स्वभाव आणि पक्षाने दिलेली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. दोन वेळेला शिर्डी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरांचे नियोजन आ. काळे यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले आहे, असे दावे करत, भाकर फिरवायची झाली तर आशुतोष काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे.
योगायोगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौर्यावर येत आहेत. हा दौरा आशुतोष काळे यांच्या पथ्यावर पडणार का? आणि अजित पवार अहिल्यानगर जिल्ह्याला आ.आशुतोष काळेंच्या रूपाने मंत्रिपद देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.