

श्रीरामपूर: बेलापुरात काही दिवसांपूर्वी सलग दोनदा कोल्हार चौकातील एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. या चोरी प्रकरणातील संशयित चोरट्यांचा बेलापूर- पढेगाव- कान्हेगाव व लाडगावपर्यंत बेलापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला, परंतू भरधाव वेगातील चोरट्यांची कार खड्ड्यात पलटी झाल्यामुळे, चोरटे गंभीर जखमी होताच, अलगद पोलिसांनी जेरबंद केले.
बेलापूर येथील कोल्हार चौकातील एटीएम दोनदा फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला होता. निळ्या रंगाच्या मारुती कारमधून आलेल्या काही इसमांनी एटीएम फोडण्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. निळ्या रंगाची कार स्पष्ट दिसते. (Latest Ahilyanagar News)
सलग दोनदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर, चोरट्यांनी पुन्हा तिसर्यांना एटीएम फोडण्याचा प्लॅन बनविला होता. यासाठी संपूर्ण गावाचा सर्वे करून, चोरटे बाजार तळाजवळ थांबले होते. ही बाब गावातील एका सुज्ज्ञ नागरिकाने बेलापूरचे पोलिस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांना सांगितली.
लोखंडे व पोलिसांनी तत्काळ बाजार तळाकडे धाव घेतली असता, त्यांना निळ्या रंगाची मारुती 800 कार उभी दिसली. कारच्या काचा बंद असल्यामुळे लोखंडे यांनी, काचा वाजवून कारमधील इसमांना आवाज दिला, परंतू पोलिसांना ओळखताच, चोरट्यांनी वाहन भरधाव वेगाने चालवित, पुढे नेले. चोरटे पसार होत असल्याचा प्रकार लक्षात येताच, नंदकिशोर लोखंडे यांनी, बेलापूर पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल भारत तमनर यांना, कारचा पाठलाग करण्यास सांगितले.
घटनेची गांभीर्य लक्षात घेवून, तमनर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव व पोलिस हवालदार बाळासाहेब कोळपे यांना या प्रकाराची माहिती देवून, भरधाव वेगातील कारचा पाठलाग सुरू केला.
श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जाधव, पोलिस हवालदार बाळासाहेब कोळपे व पंकज सानप यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. चोरट्यांनी कार पढेगावकडे वळविली असता, पोलिसांचा पाठलाग सुरुच होता. कार खड्ड्यात पलडी झाल्यामुळे चोरटे अलगद पोलिसांच्या हाती लागले.
नागरिकांकडून चोरट्यांना चोप!
अपघातस्थळी पोलिस पोहोचेपर्यंत नागरिकांची गर्दी दाटली होती. चोरट्यांच्या भरधाव वेगातील कारने रस्त्यावरील काहींना पुसटसा धक्का देवून, जखमी केल्यामुळे ते नागरिक कारचा पाठलाग करीत कारजवळ पोहोचले. कार पलटी झाल्यामुळे नागरिकांनी, त्या तिन्ही संशयित चोरट्यांना कारमधून बाहेर काढून, बेदम चोप दिला. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी पोहोचले. तिन्ही चोरट्यांना त्यांनी ताब्यात घेतले.
चोरट्यांकडे आढळले नकली पिस्तुल
चोरट्यांकडे बनावट पिस्तुलसह दोरी, लोखंडी टॉमी, काळे गॉगल्स, काळे कपडे, मास्क असे साहित्य आढळले. प्लास्टिक कॅनमध्ये पेट्रोल भरलेले आढळले. अपघातग्रस्त कार पोलिसांनी, इतर वाहनांच्या साहाय्याने ओढून, बेलापूर पोलिस स्टेशनच्या आवारात लावली आहे.भरधाव वेगातील कार पलटी झाल्यामुळे कारमधील तिन्ही संशयित चोरटे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ दवाखान्यात हलविण्यात आले.
चोरटे-पोलिसांची सिनेस्टाईल शर्यत!
चोरटे पुढे अन् पोलिस मागे अशी अगदी सिनेस्टाईल शर्यत सुरू झाली. लाडगाव चौकीमागे चोरट्यांची कार पोहोचली असता, पुढे मिरवणूक आडवी आली. यामुळे साहजिकच, चोरट्यांना कार हळू चालवावी लागली. नेमकं याचाच लाभ उठवित बेलापूर पोलिस कारजवळ पोहोचणार तोच, कारचा पुन्हा वेग वाढला. लाडगाव- कान्हेगाव चौकीजवळून भरधाव वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार एका खड्ड्यात पलटी झाली. तोपर्यंत पोलिस पोहोचले. कारमधील तिन्ही संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले.
चोरटे-पोलिसांची सिनेस्टाईल शर्यत!
चोरटे पुढे अन् पोलिस मागे अशी अगदी सिनेस्टाईल शर्यत सुरू झाली. लाडगाव चौकीमागे चोरट्यांची कार पोहोचली असता, पुढे मिरवणूक आडवी आली. यामुळे साहजिकच, चोरट्यांना कार हळू चालवावी लागली. नेमकं याचाच लाभ उठवित बेलापूर पोलिस कारजवळ पोहोचणार तोच, कारचा पुन्हा वेग वाढला. लाडगाव- कान्हेगाव चौकीजवळून भरधाव वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार एका खड्ड्यात पलटी झाली. तोपर्यंत पोलिस पोहोचले. कारमधील तिन्ही संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले.
‘ती’ कार व्हाट्सअॅपवर व्हायरल!
बेलापुरातील एटीएमच्या आत- बाहेर, कोल्हार चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असतानासुद्धा चोरटे एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेर्याला काळी पट्टी लावून, एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते, परंतू तब्बल दोनदा ते अयशस्वी ठरले. पुन्हा तिसर्यांना रात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न होता. यामुळे त्यांनी कारमधून बेलापुरात चक्कर मारली, परंतू दुर्दैवाने कार व्हाट्सअॅपवर व्हायरल झाल्यामुळे एका सुज्ज्ञ नागरिकाने पोलिसांना मोबाईल कॉल केला. यामुळेच बेलापूर पोलिसांनी शिताफिने पाठलाग करून, मोठ्या कौशल्याने चोरट्यांचा पाठलाग करून, त्यांना जेरबंद केले.