Ahilyanagr Ganeshotsav DJ Ban: डीजे बंदीमुळे पारंपरिक वाद्यांना ‘अच्छे दिन’; ढोल-ताशा, हलगी, तुतारीला पुन्हा मागणी

गणेशोत्सवात आधुनिक ध्वनिक्षेपकांना फाटा; ग्रामीण भागातील पारंपरिक कलाकारांना रोजगाराची संधी
Ahilyanagr Ganeshotsav DJ Ban
Ahilyanagr Ganeshotsav DJ BanPudhari
Published on
Updated on

शेवगाव: अहिल्यानगर जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डीजे, डॉल्बी व ध्वनिप्रदूषणासंदर्भात घेतलेल्या कडक भूमिकेमुळे ग्रामीण भागातील पारंपरिक वाद्यांना पुन्हा अच्छे दिन आले आहेत. अनेक वर्षांपासून आधुनिक ध्वनिक्षेपकांच्या वाढत्या वापरामुळे आडगळीत पडलेले ढोल-ताशा, हलगी, तुतारी, लेझीम पथक आणि पारंपरिक वाजंत्री यांना यंदाच्या गणेशोत्सवात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Ahilyanagr Ganeshotsav DJ Ban
Ahilyanagr District Bank Election: जिल्हा बँकेच्या अंतिम मतदार यादीकडे लक्ष; आजपासून राजकीय समीकरणांना वेग!

गणेश मंडळांनीही पोलिसांच्या डीजे बंदीच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद देत पारंपरिक वाद्यांच्या साथीने उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याने सोमवारी सकाळपासूनच शेवगाव शहरासह ग्रामीण बाजारपेठांमध्ये मोठी लगबग दिसून आली. गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई, पूजेचे साहित्य यासह मंडप उभारणीसाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. घरगुती गणपतीच्या प्रतिष्ठापनेसाठीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

Ahilyanagr Ganeshotsav DJ Ban
Ahilyanagar Ganeshotsav: अहिल्यानगरीत बाप्पाचा जल्लोषात प्रवेश; ढोल-ताशांच्या गजराने शहर दुमदुमले

सायंकाळी विविध मंडळांकडून गणेशमूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी डीजेऐवजी ढोल-ताशांचा गजर, हलगीचा कडकडाट, लेझीम पथकांचे सादरीकरण आणि पारंपरिक वाजंत्रीच्या साथीने गणरायाचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी गणेशोत्सवाचा पारंपरिक आणि उत्साही माहोल पाहायला मिळाला. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव, लग्न समारंभ, मिरवणुका आणि विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये डीजे व डॉल्बीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. परिणामी ग्रामीण भागातील अनेक पारंपरिक वाद्ये आडगळीत पडली होती. अनेक पारंपरिक वादकांचाही रोजगाराची प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, यंदा डीजेवरील निर्बंधांमुळे या वाद्यांना पुन्हा अच्छे दिन आले आहेत.

Ahilyanagr Ganeshotsav DJ Ban
Gavhanewadi Firing: गव्हाणेवाडीत दोन तरुणांवर गोळीबार; तीन राऊंड फायर, मिस फायरमुळे अनर्थ टळला

ढोल-ताशा पथक, हलगी पथक, लेझीम पथक, तसेच पारंपरिक वाजंत्री, बँड पथक यांना गणेश मंडळांकडून कार्यक्रमांसाठी बोलावले जात आहे. त्यामुळे या कलाकारांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याला चालना मिळाल्याने स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असताना अनेक मंडळांनी यंदा डीजेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या आवाजातील डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, तसेच विद्यार्थी यांना त्रास होतो. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या लक्षात घेऊन पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याची भूमिका काही मंडळांनी घेतली आहे.

Ahilyanagr Ganeshotsav DJ Ban
Ahilyanagar Municipal Corporation Tax: अहिल्यानगर महापालिकेची कर वसुली कासवगतीने! २६१ कोटींची थकबाकी

पारंपरिक कलाकारांना रोजगाराची संधी

ग्रामीण भागात अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पारंपरिक वाद्य वाजविण्याच्या कलेवर अवलंबून आहे. मात्र आधुनिक मनोरंजनाच्या साधनांमुळे या कलेला मागील काही वर्षांत अपेक्षित मागणी राहिली नव्हती. गणेशोत्सवानिमित्त पुन्हा एकदा ढोल-ताशा व हलगी पथकांना कार्यक्रम मिळू लागल्याने या कलाकारांना आर्थिक हातभार मिळणार आहे.

पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत

डीजे व ध्वनिप्रदूषणासंदर्भात पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे गणेश मंडळांनी स्वागत केले आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेला सहकार्य करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news