Sina River Deepening Cost: ‘सीना’ खोलीकरणाच्या खर्चावर अंदाज समितीचा सवाल; १७३ रुपये प्रतिक्युबिक मीटर दरावर आक्षेप

महापालिकेतील विविध योजनांची झाडाझडती; कापूरवाडीतील अवैध मुरूम उत्खननाची पाहणी, निळवंडे दौरा रद्द
Sina River
Sina RiverPudhari
Published on
Updated on

नगर: विधिमंडळ अंदाज समितीने शुक्रवारी (दि. ७) महापालिकेत प्रदीर्घ बैठक घेत विविध प्रकल्पांची झाडाझडती घेतली. ‘सीना’तील अतिक्रमणांचा आणि खोलीकरणाच्या खर्चाचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर समितीही खोलात शिरली. मनपातील बैठकीनंतर समितीने थेट ‘सीना’काठी धाव घेत खातरजमा केली. तत्पूर्वी सकाळी कापूरवाडी अवैध मुरूम उत्खननाची प्रत्यक्ष स्थळपाहणी केली. या पाहणी दौऱ्यातच दिवस सरल्याने समितीचा ‘निळवंडे’ भेटवजा पर्यटन दौरा रद्द झाला.

Sina River
Caste certificate verification| जात प्रमाणपत्र रद्दप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना: पालकमंत्री विखे पाटील

आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या आमदारांच्या विधिमंडळ अंदाज समितीने शुक्रवारी (दि. ७) महापालिकेअंतर्गत राबविण्यात आलेल्या अमृत भुयारी गटार योजना, फेज टू पाणीपुरवठा योजना, नगरोत्थानअंतर्गत होणारे रस्ते आणि पर्यटन विकासअंतर्गत होणाऱ्या कामांचा आढावा घेतला. समिती आज निळवंडे धरण व कालव्यांचे काम पाहण्यासाठी जाणार होती; मात्र तो दौरा रद्द करून अचानक महापालिकेत धडकली. महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांना समितीने चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाच रडारवर घेतल्याची चर्चा आहे.

Sina River
Rahuri gambling raid: डिग्रसमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त; चौघांविरुद्ध गुन्हा

विधिमंडळ अंदाज समिती शुक्रवारी दुपारी महापालिकेत धडकली. महापालिकेच्या सभागृहात समितीचे अध्यक्ष आ. खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रामुख्याने राज्य सरकारच्या निधीतून राबविण्यात आलेल्या अमृत भुयारी गटार योजना, फेज टू पाणी योजनेचे काम पूर्ण होऊन योजना कार्यान्वित झाली की नाही याची माहिती घेतली. तसेच, शहरात शासनाच्या निधीतून, दलित वस्ती सुधार योजना, नगरोत्थान योजनेतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. विद्युत विभागाचा आढावा घेत नगरोत्थान योजनेतून किती पथदिवे बसविले याबाबतही विचारणा करण्यात आली.

Sina River
Rahuri News: सासरचा छळ! व्हॉट्सॲप स्टेटसवर सुसाईड नोट ठेवत तरुणाने संपवल जीवन

दरम्यान, महापालिकेत समिती सदस्यांनी आयुक्तांच्या नूतनीकरण केलेल्या दालनाची पाहणी केली. त्यानंतर थेट सीना नदी गाठली. सीना नदी खोलीकरणासाठी २० कोटी, तर भिंगार नाला खोलीकरणासाठी १३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. केवळ खोलीकरणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी कसा, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. कारण जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २२.४० रुपये क्युबिक मीटर दराने खोलीकरण केले जाते. महापालिकेच्या हद्दीत नदी खोलीकरणासाठी १७३ रुपये क्युबिक मीटर इतका दर कसा, असा सवाल समितीने उपस्थित केला.

Sina River
Ahilyanagar voter list revision: जिल्ह्यातील सव्‍वाचार लाख मतदारांची वगळणी; ३३ लाख ९४ हजार मतदारांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध होणार

मोजकेच सदस्य उपस्थित

समितीने महापालिकेत दुपारी शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. मात्र, मोजक्याच सदस्यांनी या बैठकीला हजेरी लावली. महापालिका कार्यालय व सीना नदीची पाहणी करण्यासाठीही मोजकेच सदस्य उपस्थित होते.

कोणी भरले समितीचे कान?

अंदाज समितीने गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेला टार्गेट केल्याची चर्चा अधिकारी वर्गात सुरू आहे. कारण महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप असे सत्तासमीकरण आहे. त्यामुळेच समितीने महापालिकेला टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समितीचे कान भरले, अशी खमंग चर्चा सुरू आहे.

समितीसमोर फायलींचे गाठोडे

अंदाज समिती कोणत्या योजनेबाबत काय विचारेल याचा ‘अंदाज’ नसल्याने महापालिकेच्या बांधकाम, पाणीपुरवठा, नगररचना, विद्युत आदी विभागांच्या कर्मचाऱ्यांनी फायलींचे गाठोडेच समितीसमोर आणले होते. त्याची ने-आण करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती.

माध्यम प्रतिनिधींना मज्जाव

महापालिकेत बैठक सुरू असताना पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. बैठक संपल्यानंतरही समिती सदस्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. समिती सीना नदीची पाहणी करण्यासाठी गेली असता तेथे आणि कापूरवाडी परिसरात मुरूम उत्खननाची पाहणी करतानाही फोटो काढणाऱ्या पत्रकारांना समितीच्या यंत्रणेकडून रोखण्यात आले. याचे कारण मात्र कोणीही स्पष्ट केले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news