

गोरक्ष शेजूळ
नगर: वंशाचा दिवा हा आपल्या म्हातारपणी अंधःकारमय होऊ पाहणाऱ्या आयुष्यात प्रकाश देईल, ही आशा सर्वसाधारणपणे सर्वच पालकांची असते. मात्र आपल्या मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या पदरी याबाबत निराशा पडताना दिसते. गेल्या पाच वर्षांत पोटच्या मुलांनी, सुनांनी वयोवृद्ध आई-वडिल- सासू-सासऱ्यांचा सांभाळण्यास असमर्थता दर्शवल्याची तब्बल सव्वापाचशेहून अधिक उदाहरणे समोर आली आहेत.
यातील काही प्रकरणांत गोड बोलून मुलांनी मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेत आई-वडिलांना घराबाहेर काढल्याच्या तक्रारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यातील 490 प्रकरणे निकाली काढली असून, काहींना महिन्याला 10 हजारांचा निर्वाह भत्ता (पोटगी), तर काही प्रकरणात घर-जमिनीही पुन्हा मिळवून दिल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत, त्यांना संरक्षण दिले आहे.
मात्र, काही कुटुंबांत मुलांचे लग्न झाल्यानंतर घरातील ज्येष्ठांंचा काहीसा छळ होताना दिसतो. जिल्ह्यातील शिर्डी, पाथर्डी, श्रीगोंदा-पारनेर, कर्जत, संगमनेर, श्रीरामपूर, नगर अशा सात प्रांताधिकारी कार्यालयांकडे अशा छळाला कंटाळून संबंधित ज्येष्ठ नागरिक तक्रारी देत असतात. त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन निकाल देतात. जिल्ह्यातील सात प्रांत कार्यालयांकडे 2021 ते 2025 या पाच वर्षांत एकूण 529 ज्येष्ठ नागरिकांनी तक्रारी दिल्या असून, यात बहुतांश तक्रारी ह्या आपल्या मुलांकडून, सुनांकडून, शेजारील लोकांकडून त्रास होत असल्याच्या आहेत.
पोरांकडून विश्वासघात
काही कुटुंबांत दोन मुले वेगळी झाल्यानंतर आई-वडिलांना कोणी सांभाळायचे, यावरून कलह वाढल्याचे दिसले. दोघांनीही पूर्वीच वडिलांची मालमत्ता वाटून घेतली. काही प्रकरणांत मुलाचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी सुनेने सासऱ्याला घराबाहेर काढले आहे. कुठे मुलगा आणि सुनांनी गोड बोलून घर नावावर करून घेतले, कुठे ‘आहे ते पैसे’ काढून घेत बँक खाते रिकामे केले आणि आता घराबाहेर काढले.
आई-वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांमध्ये काही पेशाने अधिकारी, शिक्षक, एमआयडीसीत कर्मचारी आणि आता शेतकऱ्यांची पोरंही दिसू लागली आहेत. काही प्रकरणात तक्रारदार वडिलांना आजारपणाने ग्रासले आहे, औषधोपचारासाठी पैसे नाहीत, पत्नी आजारी आहे, काही ठिकाणी पत्नीचीही साथ सुटलेली आहे, अशा परिस्थितीने हवालदिल झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी मुलगा-सून यांच्याकडून पोटगी मिळावी, यासाठी तक्रार केली आहे. साधारणतः 50 पेक्षा अधिक तक्रारी ह्या ज्येष्ठ नागरिकांवरील खोटे गुन्हे, शेजारच्या लोकांकडून त्रास, जमिनीचे वाद असेही असल्याचे समजले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिला पोटगीचा न्याय मिळवून
तत्कालीन तसेच सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. या सुनावणीमध्ये आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांना प्रती महिना 10 हजार रुपये वडिलांना निर्वाहासाठी देण्याचे, तर काही प्रकरणात मुलांनी फसवून बळकावलेली मालमत्ता पुन्हा वडिलांच्या नावावर करून घेण्याचे आदेश बजावले आहेत. अन्य वादांतही जिल्हाधिकाऱ्यांनी ज्येष्ठांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे 490 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय मिळवून दिला आहे. या प्रक्रियेत सदस्य सचिव असलेले सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांचेही मोठे योगदान राहिले आहे.
विभागनिहाय एकूण तक्रारी
शिर्डी: 84
पाथर्डी: 39
श्रीगोंदा-पारनेर: 33
कर्जत: 38
संगमनेर: 141
श्रीरामपूर: 87
नगर: 118
एकूण: 539
काही कुटुंबात अजूनही संस्कार जिवंत आहेत. मात्र काही ठिकाणी आई-वडिलांना सांभाळले जात नसल्याचे पाहिले आहे. ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी जिवाचे रान केले, ज्यांच्यामुळे आज जग पाहायला मिळाले, त्यांचा विश्वासघात करू नका. आणि आई वडिलांनीही भोळे राहू नये. सगळे पोरांच्या नावावर करून देऊ नका, काही हातात ठेवा, तरच तुम्हाला ते सांभाळतील.
सुनील आडसुरे, प्रगतशील शेतकरी, उंबरे