

अहिल्यानगर : शालेय स्तरावर विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षेला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कायदे लागू केले असले तरी, काही असंवेदनशील शिक्षकांच्या वर्तणुकीत अद्यापही बदल झालेला नाही. याच वास्तवाचा प्रत्यय अहिल्यानगरमधील एका संतापजनक घटनेवरून आला. येथे प्राचार्याने अमानुषपणे तिसरीतील एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा गळा दाबून हवेत उचलले. नंतर त्याच्या हाताचा चावाही घेतला.
अहिल्यानगर शहराजवळील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवर्षीय विद्यार्थ्यासोबत हा अत्यंत संतापजनक प्रकार घडला. वर्गातील विद्यार्थ्यांच्या आपापसांतील भांडणाची माहिती तिसरीत शिकणाऱ्या मुलाने वर्गशिक्षिकेला दिल्यानंतर त्यांनी प्राचार्य गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले. मात्र, समजूत काढण्याऐवजी प्राचार्यांनी रागाच्या भरात या विद्यार्थ्याचा चक्क हात चावला आणि गळा दाबून त्याला काही सेकंद हवेत उचलून धरले. या अमानुष घटनेप्रकरणी विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात प्राचार्य बहादुर्गे यांच्याविरुद्ध बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.