

नगर: उप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सावळा गोंधळ आणि एंजटगिरीचा फटका परवानाधारक रिक्षा चालकांना बसत आहे. आरटीओ कार्यालय एजंट मुक्त करण्यासह विविध मागण्यासाठी ॲटो रिक्षा चालक- मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले.
या आंदोलनात ॲटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, उपाध्यक्ष दत्ता वामन, कार्यध्यक्ष विलास कराळे, अशोक औशीकर आदींसह पदाधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
शहरामध्ये स्क्रॉप असलेल्या रिक्षा दुसऱ्या जिल्ह्यातून बेकायदेशीर शहरात व्यवसाय करतात. त्यावर कोणीही कारवाई करीत नाही. त्यावर कारवाई कारवाई करा. परवानाधारक अॅटो रिक्षा पासिंग व इतर कामासाठी त्यांना बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे वार द्या. त्यांना ट्रक व इतर वाहनांच्या लाईनमध्ये उभे करू नका. परवाना धारक रिक्षा चालकांची पासिंग व इतर कामे करण्यासाठी त्यांना मदतणीस म्हणून अधिकारी व कर्मचारी नेमा त्यांना एजंटकडे जाण्यास भाग पाडू नका ते तुम्हास टॅक्स देतात.
स्क्रॅप रिक्षा पकडल्यास ती जप्त करा ती सोडू नका. काही लोक रिक्षाला काळा पिवळा रंग देवून व्यवसाय करतात. त्यांच्यावर कारवाई करा. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अवारातील फोर व्हीलर टू व्हीलरमध्ये ऑफिस थाटलेले आहेत. ते तत्काळ बंद करावे. तीन प्रवासी परवाना असताना ८ ते १० प्रवासी वाहतूक करतात त्यांच्यावर कारवाई करा, अशा मागण्या केल्या आहेत.
जीवघेणा खेळ बंद करा
शहरात विनापरवाना सुमारे ५०० चारचाकी वाहनांमधून शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. त्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कोणत्याही स्वरूपाची काळजी न घेता विना परवाना वाहतूक केली जात आहे. काही अनुचित घटना घडल्यास आरटीओ कार्यालय त्याची जबाबदारी घेणार आहे का असा सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
रिक्षा अडवून प्रवासी उतरवले
ॲटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले. त्यास समिश्र प्रतिसाद मिळाला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनमाड रस्त्यावर रिक्षा अडवून प्रवाशांना उतरवून दिले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.