

नगर: महापालिकेचा सुधारित प्रारूप विकास आराखडा व वाढीव हद्दीचा पहिला आरखडा महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात ४७९ ठिकाणी आरक्षण टाकण्यात आले आहे. एकूण नियोजन क्षेत्र ६८०९.०७ हेक्टर असून, त्यात विकासयोग्य क्षेत्र ६०८२.१५ हेक्टर व अविकासनीय क्षेत्र ७२६.९२ क्षेत्र असे वर्गीकरण करण्यात आले आहे
दरम्यान, आराखड्यावर नागरिकांना ९ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. यासाठी अहिल्यानगर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालय तसेच टीव्ही सेंटर येथील उपसंचालक नगररचना डीपी युनिट कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत या हरकती व सूचना स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नव्या विकास आराखड्यात शहराच्या भावी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक व सामाजिक सुविधांसाठी एकूण ४७९ आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली असून, त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ ४१५.१५ हेक्टर इतके आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून पार्किंगसाठी ३२ जागांवर आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
नवीन सुधारीत आरखड्यात नागरिकांना सर्व सुविधा सुलभतेने देण्यासाठी सार्वजनिक उपयोगिता, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि मनोरंजनाच्या जागांचे योग्य नियोजन करून शहरातील राहणीमानात सुधारणा करणे आणि शहर रचनेची दीर्घकालीन सक्षमता बळकट करण्याचे उद्दिष्ट या आराखड्यातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आरक्षणाचा प्रकार क्षेत्रफळ व संख्या
क्रीडांगणासाठी सर्वाधिक १०३.५३ हेक्टरवर ९० आरक्षणे
एएमटी बस स्थानकासाठी २.७२ हेक्टरवर ७ आरक्षणे
दफनभूमीसाठी ७ हेक्टरवर ७ आरक्षणे
स्मशानभूमीसाठी ८.४६ हेक्टरवर १० आरक्षणे
बहुउद्देशीय सभागृहांसाठी ५.८३ हेक्टरवर १० आरक्षणे
शैक्षणिक सुविधांसाठी २६.२२ हेक्टरवर ४० आरक्षणे
अग्निशमन केंद्रासाठी १.२३ हेक्टरवर ३ आरक्षणे
उद्यान व बगीच्यासाठी ८२.४४ हेक्टरवर ८६ आरक्षणे
आरोग्य सुविधांसाठी १०.६४ हेक्टरवर २८ आरक्षणे
ग्रंथालयांसाठी ०.८५ हेक्टरवर ११ आरक्षणे
महानगरपालिका प्रयोजनासाठी ११.४३ हेक्टरवर ३८ आरक्षणे
वाहनतळासाठी १५.८२ हेक्टरवर ३२ आरक्षणे
मैला शुद्धीकरण केंद्रासाठी १०.२५ हेक्टरवर ४ आरक्षणे
घनकचरा व्यवस्थापन स्थळासाठी १३.०४ हेक्टरवर ६ आरक्षण
नगर भवनासाठी ५.५३ हेक्टरवर ४ आरक्षणे
मंडई,खरेदी केंद्र किंवा बाजारासाठी ३१.०७ हेक्टरवर ६० आरक्षणे
पाणी उपसा केंद्रासाठी ०.२२ हेक्टरवर २ आरक्षणे
इतर सार्वजनिक कारणांसाठी ७८.९६ हेक्टरवर ४१ आरक्षणे
एकूण ४७९ आरक्षणे प्रस्तावित
एकत्रित क्षेत्रफळ ४१५.९५ हेक्टर
सुधारीत विकास आराखडा शाश्वत व वाढीभिमुख शहरी विकासाच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आला असून, त्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांचे जतन करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. आर्थिक उपक्रमांसाठी व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रांची स्वतंत्र तरतूद केल्याने भविष्यात अहिल्यानगरमध्ये रोजगार निर्मितीला आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
- यशवंत डांगे, आयुक्त