

नगर: गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अरिष्टात सापडलेल्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्यावर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. ३७० कोटींच्या थकबाकीपोटी कारखान्याच्या सर्व चल व अचल तारण मिळकत जप्त करण्यात येत असल्याच्या नोटिशीचा फलक सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) कारखाना कार्यस्थळावर लावण्यात आला आहे.
त्यावर प्राधिकृत अधिकारी म्हणून सुरेश पाटील यांचे नाव आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने आजारी आहेत. यातील बहुतांश कारखाने जिल्हा बँकेच्या कर्जापोटी ‘एनपीए’मध्ये गेले आहेत. साधारणतः दोन हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम ही कारखान्यांकडे थकीत असल्याचे समजते. यात कुकडी कारखान्याचाही समावेश आहे.
कुकडी सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. दोन वर्षांपासून गाळपही बंद आहेत. त्यातच, कारखान्यावर जिल्हा बँकेचे व्याजासह सुमारे ३७० कोटींचे कर्ज आहे. कारखाना व्यवस्थापनाने बँकेने पाडून दिलेले हप्ते वेळेवर भरलेले नाहीत. त्यामुळे वेळोवेळी नोटिसा पाठवण्यात आल्या. दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली. मात्र, तरीही कर्जाची रक्कम भरण्यास कारखाना असमर्थ असल्याचे लक्षात घेऊन बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी जप्तीसाठी बँकेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली होती.
टायमिंग शॉट; राहुल जगताप नेमके कोणाचे टार्गेट?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण तापत असतानाच, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा बँकेचे इच्छुक उमेदवार राहुल जगताप यांच्या कुकडी सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नगर दौऱ्याला तीन दिवस उलटत नाही, तोच ही कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल जगताप यांच्यासाठी हा ‘टायमिंग शॉट’ मानला जात आहे!
राहुल जगताप हे (स्व.) अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ही जागा महायुतीतील मित्रपक्ष भाजपचे विक्रमसिंह पाचपुते यांच्यासाठी सोडावी लागली. परंतु राहुल जगताप यांनी बंड करून अपक्ष निवडणूक लढवली. त्याच वेळी अनुराधा नागवडे यांनीही शिवसेना ठाकरे गटातून ही निवडणूक लढवली. त्यामुळे नागवडे-जगताप मतविभाजन होऊन पाचपुते विजयी झाले, तर जगताप-नागवडेंमधील मनभेद वाढतच गेले. पुढे, अजित पवार यांनी श्रीगोंद्यात येऊन ‘झालं गेलं विसरून पुन्हा एकत्र काम करा’ असे आवाहन करत राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांना एकत्र आणले होते. मात्र, जगताप आणि नागवडे या दोघांनाही विधानसभेचे वेध असल्याने भविष्यातही हा संघर्ष मिटण्याची शक्यता धूसरच मानली गेली.
दरम्यान, आता जिल्हा बँकेची निवडणूक लागणार आहे. गेल्या महिन्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात विक्रमसिंह पाचपुते आणि राजेंद्र नागवडे यांना एकाच मंचावर घेऊन दोघांतील राजकीय मतभेद दूर केले. त्यामुळे साहजिकच बँकेच्या निवडणुकीत पाचपुते-नागवडे एकत्र दिसतील, असे समीकरणही तयार झाले. मात्र, पुढच्याच दोन दिवसांत मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राहुल जगताप यांच्यासोबत राजेंद्र नागवडे हेही दिसले. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांनी राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे हे दोघेही जिल्हा बँकेत कसे पोहचतील, यासाठी सोयीने चाचपणी करण्याच्याही सूचना केल्या. मात्र, बदललेले राजकीय समीकरण आणि श्रीगोंद्यातील मतांची संख्या पाहता या वेळी राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या जागेवर जगताप की नागवडे, अशी अंतर्गत चूरस म्हणूनच कायम आहे.
राहुल जगतापांची गैरहजेरी...
राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार तीन दिवसांपूर्वी नगर दौऱ्यावर होत्या. त्यांचा विखे पाटील यांच्या निवासस्थानी सत्कार झाला. तेथे अनुराधा नागवडे यांनी आवर्जून हजेरी लावली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सुनेत्रा पवार यांना थेट श्रीगोंद्यात आपल्या निवासस्थानी नेले आणि आदरतिथ्य केले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या गुडबुकमध्ये जगतापांना ओलांडून नागवडे केव्हाच पोहचल्याचे स्पष्ट झाले! त्यातच या संपूर्ण दौऱ्यात राहुल जगताप कोणालाच कोठेही दिसले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीत विशेषतः नागवडे-जगताप यांच्यातील दरी कायम असल्याचे दिसून आले.
‘अशोक’ बॅंकेनंतर ‘कुकडी’ कारवाईलाही राजकीय झालर?
जिल्हा बँकेचे इच्छूक उमेदवार तथा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अशोक बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. या कारवाईला देखील जिल्हा बँक निवडणुकीचे धागेदोरे जोडले आहेत. त्यात राहुल जगताप हे राष्ट्रवादीत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर ते सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पक्षाचे काम करत आहेत. ते स्वतः जिल्हा बँकेचे संचालक आहेत. राज्यात राष्ट्रवादीही सरकारमध्ये आहे, त्यामुळे जगताप हेही सत्ताधारी गटाचाच एक भाग असताना आणि बँकही राष्ट्रवादीच्याच वर्चस्वात असताना, अगदी निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षाच्याच एका नेत्याच्या कारखान्यावर अशा प्रकारे जप्तीची कारवाई होणे हा निव्वळ योगायोग नसून, हा राजकीय डावपेच असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत राहुल जगताप ‘नेमकी कोणासोबत’ याच्याही अभ्यासाचा भाग म्हणून या जप्तीकडे पाहिले जात आहे.
नागवडेंचा मार्ग मोकळा?
श्रीगोंद्यातून गतवेळी सर्वसाधारणमधून राहुल जगताप, तसेच महिला राखीवमधून अनुराधा नागवडे हे दोन संचालक होते. यावेळी महायुतीत जागावाटप होणार आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे बंधू प्रताप पाचपुते हे भाजपाकडून इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून राहुल जगताप, डॉ. प्रणोती जगताप यांच्यासह राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांचाही दावा आहे. पाचपुते यांची उमेदवारी अंतिम समजली जात आहे, तर राष्ट्रवादीकडून नेमकी कोणाला संधी मिळणार, याविषयी चर्चा आहेत. अगदी याच वेळी राहुल जगताप यांच्या कुकडी कारखान्यावर जिल्हा बँकेची ही कारवाई झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
कुकडी सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेने जप्त केलेला नाही. आजची नोटीस ही प्रक्रियेचा एक भाग आहे. मात्र, पुढच्या महिन्यात सर्व प्रश्न सुटतील. मुख्यमंत्री महोदयांच्या मदतीने एनसीडीसीचे (राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ) १४० कोटींचा कर्ज प्रस्ताव मंजूर होऊन, जिल्हा बँकेला ते पैसे मिळतील. त्यातून, जप्तीची कारवाई टळलेच, शिवाय यंदाच्या गाळपासाठी कारखानाही सज्ज होईल, असा विश्वास आहे.
राहुल जगताप, अध्यक्ष, कुकडी सहकारी साखर कारखाना