

डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीचा करवसुलीवर परिणाम झाला. दर वर्षीपेक्षा वसुलीचे प्रमाण घटले आहे. यंदा केवळ 60 कोटींची वसुली झाली. आता एसआरएचे काम सुरू आहे. पुन्हा जनगणनेचे काम वसुली कर्मचाऱ्यांकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसुलीचा डोंगर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात महापालिकेच्या 90 वसुली वार्डासाठी केवळ 45 कर्मचारी आहेत. या सगळ्याच्या महापालिकेच्या तिजोरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या हद्दीत एक लाख 38 हजार 241 मालमत्ता आहे. त्यात बंगला, रो-हाऊस, फ्लॅट, मोकळे भूखंड, गोदाम, हॉटेल यांचा समावेश आहे. तर, महापालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टी अशी एकूण 101 कोटींची थकबाकी आहे. 2025-26 मध्ये केवळ 60 कोटींची वसुली झाली. गतवर्षीपेक्षा वसुलीमध्ये एक कोटींनी घट झाली. कारण वसुली कर्मचाऱ्यांचे सुमारे तीन ते चार महिने महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत गेले.
जवळपास सर्वच वसुली कर्मचारी बीएलओ आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या कामाला प्राधान्य द्यावे लागले. परिणामी त्याचा महापालिकेच्या वसुलीवर परिणाम झाला आणि तिजोरीत खडखडाट राहिला. आताही वसुली कर्मचाऱ्यांना आणखी वेगळे काम लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सध्या एसआरए मोहीम जोरात राबविण्यास सुरुवात केली आहे. बीएलओेंकडून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे वसुली कर्मचारी सध्या एसआरएमध्ये दंग आहेत.
परिणामी या वर्षीच्या बिलाच्या पावत्या वितरित करण्यास महापालिकेकडे कर्मचारी नाहीत, अशी अवस्था आहे. दुसरीकडे एसआरएचे काम संपत नाही तोच केंद्र सरकारने जनगणनेचे काम हाती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा वसुली कर्मचारी जनगणनेच्या कामाला गेल्यास त्याचा वसुलीवर परिणाम होणार आहे. महापालिकेचे वसुली विभागाचे कर्मचारी अशाच विविध काम व्यस्त राहिल्याचे वसुलीचे उद्दिष्टे कसे पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
1,38,241 मालमत्तांच्या करवसुलीसाठी 45 कर्मचारी
यंदाचे आर्थिक वर्ष सुरू झाले असून, नव्याने मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या पावत्या वितरणचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. महापालिकेच्या चार झोनमध्ये वसुलीचे 90 वार्ड आहेत. त्यात 90 वॉर्डसाठी केवळ 45 वसुली कर्मचारी आहेत. वसुलीसाठी आणखी 15 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. एक कर्मचाऱ्यांकडे दोन ते तीन वॉर्डमधील मालमत्ता कराची वसुली करण्याचा भार आहे. त्यामुळे वसुली कशी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.