

नगर: जुने दाणेडबरा व गंजबाजारमधील गाळे भाडेवाढ अन्याकारक असून, गाळेधारकांकडून अवाजवी भाडे आकारणी करण्यात येत आहे. ही आकारणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजप व्यापारी आघाडीतर्फे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पालकमंत्री विखे पाटील यांच्या जनता दरबारात व्यापार्यांतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष महेश गुगळे, धनंजय जाधव, नीरज राठोड, हर्षल बोरा, हेमंत पवार, आनंद लहामगे, सुरेश लालबागे आदी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
निवेदनात म्हटले आहे की, दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या राजपत्रानुसार नवीन भाडे आकारणी करण्यात यावी. सन 2016-17मध्ये जे मूळ भाडे आकारणी होती व त्यानंतर करण्यात आलेले भाडे वाढ यात फार मोठी तफावत असून, ती दुरुस्त करण्यात यावी.
दि. 20 जुलै 2018 रोजी झालेल्या महासभेत गाळे धारकांचे भाडे वाढ रद्द करण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन हा निर्णय झाला असताना त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. गाळेधारक अंदाजे 50 वर्षांपूर्वीचे जुने आहे त्याचाही विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
तत्कालीन नगरपालिकेने गाळेधारकांना खुली जागा दिली असता प्रत्येक गाळाधारकाने गाळे स्वखर्चाने बांधून घेतल्याने त्यांना फक्त खुली जागा भाडे आकारणी करण्यात यावी. याबाबत मनपाकडे वेळोवेळी निवेदन देण्यात आले असून, हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय आपण घ्यावा. असे निवेदनात म्हटले आहे.