नगर: अहिल्यानगर महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीचा टक्का घसरला. 2025-26 आर्थिक वर्षात 68638 करदात्यांनी कर भरला असून 71 कोटींची वसुली झाली आहे. शास्तीमाफी योजनेत 15629 करदात्यांनी लाभ घेऊन 17 कोटींचा कर भरला आहे. शास्ती माफीची सवलत वगळता महापालिकेच्या तिजोरीत केवळ 60.35 कोटी रुपये जमा झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 8 कोटींची वसुलीचा टक्का घसरला.
महापालिकेत गत वर्षी शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून पूर्णमूल्यांकन करण्यात आले. त्यामुळे वाढीव मालमत्तानुसार मालमत्ताधारकांना कर लागू झाला. तर, पाणीपट्टीत वाढ केल्याने महापालिकेतच्या तिजोरीत भर पडणार होती. परंतु, यंदा महापालिकेची वसुली 8 टक्क्यांनी घसरली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर दरम्यान महापालिकेची निवडणूक झाल्याने सर्व वसुली कर्मचारी आणि अधिकारी महापालिका निवडणुकीच्या कामात गुंतले होते. त्याचा परिणाम वसुलीवर झाल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिकेच्या कर वसुलीमध्ये वर्षभरात ऑनलाईन कर भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. वर्षभरात 17267 करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरला आहे. वर्षभरात 68638 करदात्यांनी कर भरल्याने 71.96 कोटींच्या वसुलीची नोंद झाली. शास्तीमाफीमुळे 10.74 कोटींची सवलत देण्यात आली. त्यामुळे 60.35 कोटी वसुली झाली आहे. दरम्यान, महापालिकेला आता वसुलीसाठी व्यापक मोहीम राबवावी लागणार आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौर व आयुक्त यांनी संयुक्त रित्या वसुली मोहीम राबविणे आवश्यक आहे.
काम कशी होणार
महापालिकेने गेल्या महिन्यात 1738 कोटींचे बजेट सादर केले. त्यात अनेक नव्याने कामे सुचविण्यात आली. मात्र, त्यासाठी महापालिकेकडे स्वहिस्सा भरण्यासाठी निधी चणचण जाणवणार आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी निधी नव्हता. त्यात वसुलीची कासव गती महापालिकेचा गाढा कसा पुढे नेणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
वर्षेनिहाय वसुली अशी
2021-22 (58.82 कोटी)
2022-23 (57.59 कोटी)
2023-24 (56.09 कोटी)
2024-25 (67.84 कोटी)
2025- 26 (60.35 कोटी)