नगर: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आठ वर्षांनंतर शहराचे 68 कारभारी निवडीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीची रणधुमाळी सुरु होत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम अचानकपणे जाहीर होताच राजकीय पक्षांची आणि इच्छुकांची धांदल उडाली आहे. अगोदरच थंडीने गारठलेल्या शहरातील तापमान आता निवडणुकीच्या वातावरणाने तापणार आहे.
अहिल्यानगर महापालिकेची 2018 मध्ये निवडणूक झाली होती. विद्यमान नगरसेवकांचा कालावधी डिसेंबर 2023 मध्ये संपला. 2022 मध्ये मुदत संपलेल्या नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका आरक्षण याचिका न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे अहिल्यानगर महापालिकेवरदेखील प्रशासक नियुक्त करण्यात आला होता. अहिल्यानगर महापालिकेवर तब्बल तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरु झाली होती. प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण अंतिम झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यातील अंतिम मतदारयादी कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
15 डिसेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतर तत्काळ पालिका निवडणुकीचा बिगुल वाजेल अशी शक्यता होती. सोमवारी (दि.15) मतदारयादी अंतिम प्रसिध्द होताच, सायंकाळी महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धांदल उडाली आहे. या निवडणुकीमुळे महिनाभर शहरातील राजकीय वातावरण ऐन थंडीतही तापले जाणार आहे.
2018 पर्यंत राज्य शासनाच्या वतीने महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. यंदा मात्र महापौर कोणत्या प्रवर्गाचा असणार आहे. हे जाहीर नसतानाच राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा बिगूल वाजविला आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 17 प्रभाग असून, प्रत्येक प्रभाग चार सदस्यीय आहे. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी 3 लाख 7 हजार 9 मतदार शहरातील 68 कारभारी निवडण्यासाठी मतदान करणार आहेत.
चार मतांचा अधिकार
प्रभागात सरासरी 18 हजार मतदारसंख्या आहे. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये दोन महिलांचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्रभागातील प्रत्येक मतदाराला चार मते द्यावी लागणार आहेत.