

संगमनेर: तालुक्यातील जवळे कडलग येथे शनिवारी (दि. 13) चार वर्षांच्या मुलाचा बळी घेणाऱ्या बिबट्याला काही तासांत पकडण्यात वन विभागाला यश आले. रविवारी (दि 14) दुपारी साडेबाराच्या सुमारास परिसरात आढळलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीमने ‘डॉट’च्या साह्याने बेशुद्ध करून पकडले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, हा बिबट्या पकडण्यात अपयश आले असते, तर त्याला ठार मारण्याची परवानगी मुख्य वनसंरक्षकांनी दिली होती असे सहायक वनरक्षक अमरजीत पवार यांनी सांगितले.
जवळे कडलग येथे शनिवारी बिबट्याच्या हल्ल्यात सिद्धेश कडलग या मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. बिबट्याला ठार मारल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यामुळे वन विभागाच्या रेस्क्यू टीमसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक तसेच नागपूर येथील मुख्य वनरक्षकांनी गंभीर दाखल घेऊन संगमनेरच्या वनविभागाला रेस्क्यू टीमच्या साह्याने बिबट्याला पकडण्याचे आदेश दिले होते. शनिवारी रात्रभर ड्रोनच्या साह्याने बिबट्याचा शोध घेतला जात होता. रविवारी दुपारी बिबट्या नदीच्या परिसरात असल्याचे आढळून आले. रेस्क्यू टीमने तेथे जाऊन बिबट्याला घेरले. बेशुद्धीचे इंजेक्शन (डॉट) मारून त्याला पकडण्यात रेस्क्यू टीमला यश आले. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचान निःश्वास सोडला.
हा बिबट्या दोन ते तीन वर्षे वयाचा नर असून त्याला रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पकडलेला बिबट्या सिद्धेशवर हल्ला करणाराच आहे की दुसराच, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. वैद्यकीय तपासणीनंतर ते स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र तोपर्यंत धोका टाळण्यासाठी वन विभागाने परिसरातील इतरही बिबट्यांना पकडण्याची मोहीम ड्रोनच्या साह्याने सोमवारी रात्री सुरूच ठेवल्याचे वनक्षेत्रपाल सागर केदार यांनी सांगितले.
..तर नरभक्षक बिबट्याचे एन्काउंटरच
जवळे कडलग येथील चिमुरड्या सिद्धेश सूरज कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर तालुक्यात संतापाची उसळली आहे. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच आमदार अमोल खताळ यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन, तर यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वनमंत्र्यांना फोन करून पाठपुरावा केला. सर्वांनी बिबट्यांबाबत प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. या सर्व राजकीय पाठपुराव्यानंतर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याचे आणि तसे प्रयत्न अयशस्वी ठरल्यास त्याला ‘ठार मारण्याचे’ आदेश नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने जारी केले.
दरम्यान, सिद्धेशला शनिवारी रात्री ग्रामीण रुग्णालयात आणले, तेव्हा सर्व ग्रामस्थांनी तेथे व नंतर पोलिस ठाण्यात जाऊन तीव्र संताप व्यक्त केला. युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी या वेळी बिबट्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी वन विभागाकडे केली.
...तर त्याला ठार मारणार
प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी नाशिकच्या मुख्य वनसंरक्षकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे, की जवळे कडलग येथे मानवी जीवितास धोकादायक ठरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत. जर हेे प्रयत्न अयशस्वी ठरले, तर त्याला ठार मारण्यास मंजुरी देण्यात येत आहे. या मोहिमेसाठी नाशिक मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची ‘विशेष टीम’ तैनात करण्यात यावी.
संगमनेरला आज जनआक्रोश मोर्चा
संगमनेर तालुका सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये अनेक बिबटे नरभक्षक असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यासाठी सोमवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता संगमनेर बसस्थानकापासून प्रांत कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहिती डॉ. जयश्री थोरात यांनी दिली.
मंत्री विखे-आ.खताळांनी घेतली वनमंत्र्यांची भेट
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या दहशतीचे वास्तव निदर्शनास आणून दिले. स्थानिक पातळीवर वन अधिकाऱ्यांना पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे व गस्त वाढवण्याच्या सूचना आधीच दिल्या होत्या. मात्र, जनक्षोभ आणि धोका लक्षात घेता, मंत्री विखे पाटील यांनी थेट प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) एम. श्रीनिवास रेड्डी यांच्याशी संपर्क साधला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची व गरज पडल्यास त्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी वनमंत्र्यांकडे केली.
बाळासाहेब थोरात यांचा वनमंत्र्यांना फोन!
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून बिबट्यांबाबत तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची आणि नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली. नंतर थोरात यांनी वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी चर्चा केली. म्हैसकर यांनी घटनास्थळी डॉ. जयश्री थोरात यांच्याशी फोनवरून चर्चा केली व ग्रामीण पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना काही सूचना केल्या.