

पाथर्डी: तालुक्यातील तिसगाव येथील रविवार पेठ परिसरात गोवंशीय जनावरांची बेकायदा कत्तल सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलिसांच्या संयुक्त पथकाने पहाटे छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 3 लाखांहून अधिक किमतीचे गोमांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे, तसेच जिवंत गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली.
शनिवारी (दि. 14 ) पहाटे सुमारे 5.30 वाजता पाथर्डी पोलिस ठाणे हद्दीतील नगर-पाथर्डी रस्त्यावरील तिसगाव, रविवार पेठ येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार छापा टाकण्यात आला.
छाप्यादरम्यान नासीर मोहम्मद कुरेशी (वय 40, रा. रविवार पेठ, तिसगाव) हा गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आला. त्यास जागीच अटक करण्यात आली. त्याच्या घरासमोरील पडवीतून सुमारे 600 किलो गोमांस ( किंमत 1 लाख 20 हजार रुपये), कत्तलीसाठी वापरले जाणारे सुरे, चाकू, टोचे, तसेच दोन गायी व दोन वासरे असा एकूण 1 लाख 94 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यानंतर मिळालेल्या माहितीनुसार रेहान सालीम कुरेशी व जावाद सालीम कुरेशी यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच हे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. त्यांच्या घरातून सुमारे 800 किलो गोमांस (किंमत 1 लाख 60 हजार रुपये), कत्तलीची हत्यारे व एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा 1 लाख 64 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शाकीर सलीम कुरेशी यांच्या घरासमोर छापा टाकला असता, तोही फरार झाला. तेथून तीन जिवंत गोवंशीय जनावरे (एक बैल व दोन वासरे-किंमत 20 हजार रुपये) जप्त करण्यात आली. या प्रकरणी नासीर मोहम्मद कुरेशी याच्यासह खालीद मोहम्मद कुरेशी, फिरोज मोहम्मद कुरेशी, रेहान सालीम कुरेशी, जावाद सालीम कुरेशी, शाकीर सलीम कुरेशी व अजमत नुरा शेख यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उर्वरित आरोपी फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या प्रभावी कारवाईबद्दल गोसेवा संघाच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाचा सत्कार करण्यात आला. चांगदेव भालसिंग, अभि वामन, गुरु पाठक, समर्थ रोडी, सोमनाथ बंग, आर्यन फलके, मनोज वाघ, संतोष पालवे, मुकुंद गर्जे, अभि इथापे, शुभम तुपे, विशाल शिंदे, आशुतोष शर्मा, विवेक मोरे, आदित्य चातुर , ओम राजगुरू आदी गोसेवकांनी पोलिस पथकासोबत या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.