

नगर: एमआयडीसीत दहशत निर्माण करणाऱ्यांना आता गोळ्या, टॅबलेट देवून काही उपयोग होणार नाही. त्यांच्यावर थेट कारवाई करून त्यांचे ॲपरेशन करणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला.
एमआयडीसीतील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आमी संघटनेबरोबर बैठक घेऊन पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चर्चा केली. यावेळी पोलिस अधिकारी उपविभागीय शिरीष वमने, सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, गणेश कोलार, सतीश गवळी, संदीप कोद्रे, ठाकूर साहेब, निनाद दिपुगडे, सचिन पाठक, संदेश लोढा, समीर पटवर्धन, गुलशन बोरा, प्रफुल्ल पारख आदी उपस्थित होते. या बैठकीत काही उद्योजकांनी खंडणीखोरांकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. उद्योजकाच्या घरी जावून दहशत निर्माण करण्यात आली. पोलिसांनी संबंधितावर तातडीने केली. त्या कारवाई उद्योजकांनी स्वागत केले.
पोलिस अधीक्षक घार्गे म्हणाले, धमकीची भाषा व दबावाची पद्धत अजिबात सहन केली जाणार नाही. उद्योगपतींनी भीती न बाळगता तक्रार करावी. झिरो टॉलरन्स हीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायद्याने ठोका या स्पष्ट संदेशाचा उल्लेख करीत त्यांनी सांगितले की, कोणीही कोणत्याही पक्षाचा असो, कायदा सर्वांसाठी समान आहे.
त्यामुळे गुन्हेगारावर कठोर कारवाई होणार हे निश्चित आहे. आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ म्हणले, औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा दबाव, खंडणी किंवा गुन्हेगारी प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. उद्योजकांवर अन्याय झाला तर संघटना संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी सांगितले.
तक्रारीसाठी स्वतंत्र पेटी
औद्योगिक वसाहतीत दारू, जुगार, ड्रग्ज आणि इतर बेकायदेशीर प्रकारांवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र पेटी बसविण्याची घोषणाही करण्यात आली.