

अहिल्यानगर: लग्नात हुंडा घेऊ नये आणि देऊ नये, कर्ज काढून लग्न करू नये, लग्नानंतर सासरकडील लोकांनी सुनेचा छळ करू नये, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणार्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा, असे महत्त्वपूर्ण निर्णय येथे रविवारी पार पडलेल्या मराठा लग्न आचारसंहिता संमेलनात घेण्यात आले.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या आणि समाजातील महिलांवर होणारे अत्याचार यासंदर्भात शहरातील मराठा समाजातील मान्यवरांनी मराठा लग्न आचारसंहिता तयार केली होती. त्याबाबतचे पहिले संमेलन येथे पार पडले. याप्रसंगी मराठा समाजातील उद्योजक, समाजसेवक, वकील, डॉक्टर, महिला, शिक्षक, पत्रकार उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा उद्योजक लॉबी, छावा संघटना यांच्यासह प्रत्येक घटकातील 11 सदस्यांना वीस कलमी आचारसंहितेची शपथ देण्यात आली.
श्रीक्षेत्र डोंगरगण येथील ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनास महंत भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मराठा समाजात जागृती करण्यासाठी तयार केलेल्या या आचारसंहितेची अंमलबजावणी यंदाच्या 31 मेपासून सुरू झाली. अनेक जिल्ह्यांनी ती स्वीकारली आहे. आता ही चळवळ अधिक व्यापक होण्याासठी समाज बांधवांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
मराठा लग्न आचारसंहितेतील प्रमुख निर्णय
लग्न सोहळा 300 ते 500 लोकांतच करावा. साखरपुडा, हळद व लग्न एकाच दिवशी करावे.
लग्नात हुंडा घेऊ नये आणि देऊ नये. डीजेऐवजी पारंपरिक वाद्य व लोक कलावंतांना संधी द्यावी.
कोणत्याही स्थितीत कर्ज काढून लग्न करू नये. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणार्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा. लग्न सोहळ्यात फक्त वधू आणि वर पित्यानेच फेटे बांधावेत. लग्नात सोन्याच्या
वस्तू, गाड्यांच्या चाव्या देऊन देखावा करू नये. रोख स्वरूपात आहेर देण्याऐवजी पुस्तके द्यावीत.
भांडी, फर्निचर न देता मुलीच्या नावाने एफडी करावी. सामूहिक विवाह होण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत. लग्नानंतर मुलीच्या संसारात तिच्या आईकडून मोबाईलवर होणार हस्तक्षेप बंद करावा.
सासरच्या लोकांनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये. लग्न व दशक्रिया विधीप्रसंगी आशीर्वाद आणि श्रद्धांजली नको. उद्योग आणि आर्थिक साक्षरतेबद्दल सर्वांनी प्रबोधन करावे.