

श्रीरामपूर: निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहचविण्याची जबाबदारी ‘मी’ स्विकारली असल्याचे आश्वासन माजी खासदार तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.
निळवंडे धरणातून कालव्याद्वारे शेती व पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आलेले आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील टेलचे गाव म्हणून ओळख असलेल्या दुष्काळी चितळी गावापर्यंत निळवंडेचे पाणी पोहचले. त्यानिमित्त डॉ.सुजय विखे पाटील यांचा चितळीच्या शेतकर्यांनी प्रवरा कारखाना स्थळावर सत्कार केला. यावेळी विखे बोलत होते.(Latest Ahilyanagar News)
दोन पिढीपासून भंडारदरा व गोदावरी कॅनॉलच्या शेवटचे (टेल) गाव असलेल्या चितळी येथील अवघ्या दहा टक्के शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत होते. गावातील नव्वद टक्के भाग पाण्यापासून वंचित होता. या पार्श्वभूमिवर निळवंडे धरणातून शेतीसाठी सोडलेल्या पाण्याची चितळीच्या शेतकर्यांना प्रतीक्षा होती.
दरम्यान चितळी येथील मद्यार्क प्रकल्पातील स्पेंटवॉशमुळे येथील जमीन नापिक झालेली आहे. जमिनीत खोलपर्यंत प्रदुषित पाण्याचे प्रवाह कार्यन्वीत असल्याने येथील विहिरींचे लाल रंगाचे पाणी पिकाला देणे धोकादायक होते. निळवंडे धरणातील शुद्ध पाण्यामुळे चितळी परिसरातील प्रदुषित पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी डॉ. विखे यांना शिष्टमंडळाने जलपूजनाचे साकडे घातले.
बाबासाहेब वाघ, विष्णु वाघ, रामराव वाघ, सोपान वाघ, सुरेश वाघ, सुभाष वाघ, रमेश वाघ, दत्तात्रय गडवे, संभाजी वाघ, देविदास वाघ, मच्छिंद्र वाघ, योगेश वाघ, बाबासाहेब एकनाथ वाघ, कैलास वाघ, अनिल वाघ, सतीश वाघ, संजय वाघ, आबासाहेब वाघ, सुनिल वाघ, हरिभाऊ वाघ, गणेश वाघ, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब वाघ, हर्षल वाघ, बाबासाहेब वाघ, मंजिनाथ वाघ, सुमित वाघ, संजय धोत्रे, चांगदेव जाधव उपस्थित होते.
विखे म्हणाले, राहाता तालुक्यातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या चितळी गावास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोरडवाहू अभियानातून लाभ मिळवून दिला. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी मतदारसंघातील सतत 40 वर्षे पन्नास पैशापेक्षा कमी आणेवारी असलेले गाव म्हणून चितळीच्या धर्तीवर देशातील कोरडवाहू गावांना लाभ मिळवून दिला. चितळी गावावर विखे कुटुंबियांचे लक्ष असून येथील संपूर्ण कार्यक्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
निळवंडे धरणापासून निघालेला कॅनॉल राहाता तालुक्यातील धनगरवाडीपर्यंत झालेला आहे. धनगरवाडीपासून पुढे चितळी-धनगरवाडी परिसरातील शेतकर्यांनी लोकवर्गणी करुन पाणी चितळी मळीच्या ओढ्यापर्यंत पोहचविले. ओढ्यामुळे शेतकर्यांना पाणी मिळू शकले. ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास अधिक शेतकर्यांना लाभ मिळेल.
- बाबासाहेब दादा वाघ.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे कॅनॉलच्या पोटचार्याचे काम सुरु करताना टेलच्या चितळी कडून सुरु केले जाईल असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करुन देत निळवंडे पोटचार्याचे काम ताबडतोब चितळीकडून सुरु करावे.
- सोपान वाघ.
गोदावरी कॅनॉलवरुन चितळी गावतळ्यात पाणी सोडण्यासाठी सुरु असलेली ओनार चारी पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे भुईसपाट झाली आहे. ओनार चारी पुर्ववत सुरु करा.
- बाबासाहेब एकनाथ वाघ.