

नगर: अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौकात उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला गती मिळाली असून, या प्रकल्पासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने तसेच आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पुढे आला आहे.
डीएसपी चौक हा शहरातील वाहतुकीचा तसेच कोपरगाव-शिर्डी-कोल्हार-अहिल्यानगर या प्रमुख मार्गावरील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहने तसेच शिर्डी, कोपरगाव, कोल्हार आणि शहराच्या विविध भागांकडे जाणारी वाहतूक या चौकातून मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे.
अहिल्यानगर शहराच्या दैनंदिन वाहतुकीशी निगडित हा प्रश्न लक्षात घेऊन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी डीएसपी चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता भविष्यातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारण्याची गरज त्यांनी मांडली. त्यांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
डीएसपी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष अंमलबजावणीची दिशा मिळाली आहे.
उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. शिर्डी, कोपरगाव, कोल्हार तसेच अहिल्यानगर शहराच्या विविध भागांकडे जाणाऱ्या वाहनांना अधिक सुरळीत मार्ग उपलब्ध होणार आहे. हा उड्डाणपूल हा केवळ सध्याची वाहतूक कोंडी कमी करणारा प्रकल्प नसून, अहिल्यानगर शहराच्या पुढील अनेक वर्षांच्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत
डीएसपी चौकातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ, इंधन आणि श्रम खर्ची पडत होते. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी, रुग्णवाहिका तसेच शहराबाहेर प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा दररोज सामना करावा लागत होता. त्यामुळे उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर अहिल्यानगरकरांच्या रोजच्या प्रवासातील वेळ आणि त्रास कमी होणे हा या प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम ठरणार आहे.
अहिल्यानगरच्या विकासाला अधिक गती मिळणार
अहिल्यानगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महायुती सरकारचे आभार मानतो, अशी भावना डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. शहराच्या वाढत्या गरजा आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून शासनाने घेतलेला हा निर्णय अहिल्यानगरच्या विकासाला अधिक गती देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.