Ahilyanagar Water Scarcity: जिल्ह्यावर दुष्‍काळाचे काळे ढग, पावसाची दडी; टंचाईग्रस्‍त गावे वाढली

टँकरचा आकडा पुन्हा शंभरीपार; खरीप पिकांची वाढ खुंटली
Ahilyanagar Water Scarcity
Ahilyanagar Water ScarcityPudhari
Published on
Updated on

दीपक ओहोळ

नगर: आभाळाकडे टक लावून बसलेल्या शेतकऱ्यांची श्रावण महिन्यातही निराशा झाली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे काळे ढग दाटून आले आहेत. परिणामी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येसोबतच टँकरची संख्याही वाढली आहे.

महिनाभरापासून पाऊस गायब झाल्‍याने जिल्ह्यात खरीप संकटात सापडला आहे. दुष्‍काळी परिस्‍थितीची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. पावसाचा मोठा खंड पडल्‍याने भूजलपातळी खालावली.

Ahilyanagar Water Scarcity
Kidnapping Case: पुण्यातून अपहरण; शिर्डीजवळ सुटका; सहा जण जेरबंद

खरीप पिकांची वाढ खुंटली असून, पाणीटंचाईच्‍या झळा तीव्र होऊ लागल्‍या आहेत. पाथर्डी तालुक्‍यात नव्‍याने ३ गावे आणि १८ वाड्यांत, तर संगमनेर तालुक्‍यातील प्रत्‍येकी एक गाव आणि वाडीत टंचाईच्‍या झळा सुरू झाल्‍या.

त्‍यामुळे सहा टँकरची वाढ होऊन जिल्‍हाभरात १०३ टँकर धावू लागले आहेत. पावसाने आणखी ओढ दिल्‍यास खरीप हंगाम हातचा जाणार असून, टंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या अधिक वेगाने वाढण्‍याची शक्‍यता बळावली आहे.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तरीही नगर, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव आदी तालुक्‍यांतील काही गावांना मार्च - एप्रिलमध्‍ये टंचाईच्‍या झळा बसण्‍यास प्रारंभ होतो. यंदा मार्च महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवड्यात अकोले तालुक्‍यात पहिल्‍यांदा २ गावे आणि ६ वाड्यांना पाणीटंचाईच्‍या झळा बसल्‍या.

त्‍यामुळे पहिल्‍यांदा या तालुक्‍यात टँकर सुरु झाला. एप्रिल महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात संगमनेर तालुक्‍यातील ९ गावे आणि १५ वाड्यांसाठी टँकर सुरू झाला. त्‍यानंतर दुसर्‍या आठवड्यात नगर तालुक्‍यातील ३ गावे आणि १२ वाड्या, तसेच पारनेर तालुक्‍यातील ९ गावे आणि ८० वाड्यांना झळा बसल्‍या. त्‍यामुळे या दोन्‍ही तालुक्‍यांत टँकर धावू लागले.

उन्‍हाची तीव्रता वाढल्‍याने मे महिन्‍यात नेवासा, पाथर्डी, कर्जत, जामखेड आदी तालुक्‍यांबरोबरच पारनेर शहरालाही पाणीटंचाईच्‍या झळाना सामोरे जावे लागले. जून महिन्‍यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. ४१ टक्‍के पावसाची तूट झाली. दमदार पावसाअभावी जून महिन्‍यात टँकरचा आकडा १६२ वर गेला होता.

Ahilyanagar Water Scarcity
Ruparnwadi ZP School Teacher Protest: शाळा पंचायत समितीत भरवली शाळा; शिक्षक बदलण्यासाठी पालकांचा विद्यार्थ्यांसह सत्याग्रह

जुलै महिन्‍यात सरासरीपेक्षा अधिक म्‍हणजे १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन-तीन दमदार पाऊस झाल्‍याने जवळपास अकोले, संगमनेर, पारनेर आदी तालुक्‍यांतील काही गावांचे ५० ते ५५ टँकर कमी होऊन ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या आठवड्यात संगमनेर, नेवासा, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत व जामखेड आदी आठ तालुक्‍यांतील ९८ गावे, ४८४ वाड्यांत पाणीटंचाई परिस्‍थिती कायम होती. त्‍यामुळे १ लाख ८८ हजार लोकसंख्‍येसाठी ९८ टँकर धावत होते.

ऑगस्‍ट महिन्‍यात ९५.४ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्‍यात दिवसाआड आभाळ दाटून येत होते. पण पावसाअभावी ढग गायब होत होते. या महिन्‍यात ७४ टक्‍के पावसाची तूट झाली. त्‍यामुळे वाढीस लागलेली खरीप पिके आता जळू लागली आहेत. दमदार पावसाअभावी भूजलपातळी खालावत चालली आहे.

ऑगस्‍टच्‍या शेवटच्‍या आठवड्यात ९४ गावे आणि ५०१ वाड्यांसाठी ९७ टँकर सुरुच होते. गेल्‍या आठ दिवसांत पाथर्डी, संगमनेर तालुक्‍यांतील टंचाईग्रस्‍त गावांची वाढ झाली. त्‍यामुळे आजमितीस आठ तालुक्‍यांतील ९८ गावे ५१८ वाड्यांसाठी १०३ टँकर धावत असल्‍याचे जिल्‍हाधिकारी कार्यालयातील टंचाई विभागाच्‍या अहवालात म्‍हटले आहे.

...तर रब्‍बी हंगामही हातचा जाणार

गेल्‍या पंधरा-वीस दिवसांपासून धरणांच्‍या पाणलोट क्षेत्रातूनही पाऊस गायब झाला आहे. त्‍यामुळे विसर्ग बंद होऊन गोदावरी, प्रवरा, भीमा, सीना आदी नद्यांतील पाणी कमी झाले आहे. भंडारदरा, निळवंडे धरणे ओव्‍हरफ्‍लो झाली. मुळा धरण ९५ टक्‍के भरले.

खरीप पिके वाढीसाठी धरणांतील पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली. ‘मुळा’तून आवर्तन सुरू झाले. पावसाअभावी धरणे रिकामी होऊ लागली तर रब्‍बी हंगामातील पिकेदेखील हातची जाऊन पाणीयोजनांना फटका बसण्याची आणि परिणामी पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई निर्माण होण्‍याचीही भीती व्यक्त होत आहे.

गेल्‍या वर्षी धावत होते २२ टँकर

गेल्‍या वर्षी पहिल्‍या तीन महिन्‍यांत सरासरी २६९.४ मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा मात्र, सरासरी २५४.७ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्‍या वर्षीदेखील कमीच पावसाची नोंद असली तरी मे महिन्‍यात २०२ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्‍यामुळे गेल्‍या वर्षीच्‍या सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात २२ टँकर सुरू होते. यामध्‍ये शेवगावातील ९, पाथर्डी तालुक्‍यातील ८ व संगमनेर तालुक्‍यातील ५ टँकरचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news