

पाथर्डी: रुपनरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बदलून कायमस्वरूपी सक्षम शिक्षक देण्याच्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व पालकांनी बुधवारी (दि. २) पंचायत समितीत विद्यार्थ्यांसह बैठक सत्याग्रह केला. या वेळी विद्यार्थ्यांची शाळाच पंचायत समितीमध्ये भरविण्यात आली. पालकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनात गणेश चितळकर, सुनील वाघमोडे, दादासाहेब रुपनर, ज्ञानेश्वर रुपनर, कालिदास रुपनर, गौरव रुपनर, सुरेश रुपनर, ठकाजी रुपनर, गोविंद वाघमोडे, एकनाथ चितळकर सहभागी झाले होते.
रुपनरवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक संजयकुमार बडे हे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यास सक्षम नसल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत २५ मे रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन देण्यात आले होते. प्रशासनाने संबंधित शिक्षकांवर यापूर्वी वेळोवेळी निलंबनाची कारवाई केली असतानाही त्यांची पुन्हा शाळेवर नियुक्ती केली जात असल्याचा दावा पालकांनी निवेदनात केला आहे.
दरम्यान, संबंधित शिक्षक शाळेत हजर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थी घाबरून घरी परतल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थ, महिला पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळेत जाऊन दुपारी दोन वाजता शाळेला कुलूप लावले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तातडीने सक्षम शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
संबंधित शिक्षकाच्या कुटुंबीयांकडून गावातील पुरुषांविरुद्ध महिलांना पुढे करून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित शिक्षकावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली.
रुपनरवाडी शाळेला कायमस्वरूपी सक्षम शिक्षक उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पंचायत समिती प्रशासनाने चौकशी करून शिक्षकांवर कारवाई करू व येत्या तीन-चार दिवसांत नवीन शिक्षकांची नियुक्ती करू, असे आश्वासन दिल्यानंतर दुपारी साडेचारनंतर हे आंदोलन विसर्जित करण्यात आले.