

नगर: राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमुळे जिल्ह्यातील 389 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खाती एक कोटी 19 लाख 87 हजार 662 रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी दिली.
समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या हिताच्या काही प्रमुख योजना आहेत. अनेक विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी जावे लागते, त्या ठिकाणी त्यांना शासकीय वसतिगृह सुविधा उपलब्ध आहेच, मात्र, जर त्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही, तर त्या विद्यार्थ्यांना खासगी ठिकाणी व्यवस्था करावी लागते.
अशा वेळी शासन त्यांना वाऱ्यावर सोडत नाही. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी समाजकल्याण विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक आधार मिळतो.
चालू शैक्षणिक वर्षात योजनेचा लाभ घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील 912 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहायक आयुक्त कार्यालयाकडे आपले अर्ज सादर केले होते. सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी प्राप्त अर्जाची तपासणी केली. यातून वेगवेगळ्या कारणांनी 216 विद्यार्थ्यांचे अर्ज लाभासाठी अपात्र ठरले आहेत. तर 262 अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने याबाबत अर्जदार विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. त्या दुरुस्तीनंतर पुन्हा तपासणी होऊन त्यांनाही योजनेचा लाभ मिळू शकतो.
योजनेत 412 विद्यार्थी ठरले पात्र
412 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, यावर्षी 1 कोटी 20 लाखांची तरतूद असल्याने, यातून 389 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 23 हजार 500 रुपयांप्रमाणे सुमारे सव्वा कोटींचा निधी वाटप करण्यात आला आहे. तर उर्वरित 23 विद्यार्थ्यांसाठीही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात संबंधित विभागाचे संदीप फुंदे यांनी निधीची मागणी केली आहे.