

नगर: मामा वारंवार पैसे मागत होता. पैशाच्या कारणावरून त्याने आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही गोष्ट भाच्याला सहन झाली नाही. त्याने टणक वस्तूने मामाच्या डोक्यात घाव घालून खून केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिंदा (ता. कर्जत) खुनाची उकल करीत भाच्याला अटक केली आहे. तेजस रामदास अनभुले (वय 21, रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मयत हनुमंत गोरख घालमे (वय 35, रा. भाळावस्ती, शिंदा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हा 6 जानेवारी 2026 रोजी त्याच्या घरी झापलेला असताना त्याचा खून झाल्याचे सकाळी उघडकीस आले.
कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी घटनास्थळी पाहणी केली. उपनिरीक्षक समीर अभंग, अंमलदार हृदय घोडके, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, भीमराज खर्से, गणेश लबडे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मनोज साखरे, प्रशांत राठोड, अर्जुन बडे, चंद्रकांत कुसळकर, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांची दोन पथके करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती.
तपासात मृताचे आर्थिक व्यवहार, यापूर्वीचे वाद याबाबतची माहिती काढत असताना गोपनीय माहिती मिळाली की, मृत भाच्याकडे पैशाची मागणी करीत होता. पथकाने मृताचा भाचा तेजस अनभुले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. मयत मामा हनुमंत गोरख घालमे याच्यावर बरेच कर्ज झाले होते. तो वेळोवेळी पैशाची मागणी करीत होता.
त्यानुसार तेजस अनभुले व त्याच्या आई-वडिलांनी मृतास वेळोवेळी पैसे पुरवले. मात्र तो पुन्हा दहा लाखांची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास तेजस अनभुले याच्या आई वडिलांना मारू टाकीन अशी धमकी देत होता. त्याचा राग आल्याने तेजसने मामाच्या डोक्यात टणक वस्तू मारून खून केला, असे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कर्जत पोलिस ठाण्यात हजर केले.