

नगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत ११ जागा बिनविरोध झाल्यानंतर, तीन अपक्ष वगळता इतर सात जागांसाठी ‘सहकार’ विरुद्ध ‘परिवर्तन’ पॅनलच्या लढाईचे चित्र स्पष्ट झाले आहे. चार सोसायटीसह शेतीपूरकमध्ये ‘त्या त्या’ मतदारसंघातील मतदार मतदान करणार असून सर्वसाधारणच्या पाच जागांसाठी सर्वच ३८३७ मतदार मतदान करतील.
तालुकानिहाय मतदारांची आकडेमोड करत निकालाचे आडाखे बांधण्यास सुरुवातही झाली आहे. दरम्यान, मतदारयाद्या हाती पडताच उमेदवारांनी यंत्रणा ॲक्टिव्ह करत ‘भेटी’गाठी सुरू केल्या आहेत.
नगर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर या सोसायटी मतदारसंघाच्या दहा आणि बिगरशेतीची एक अशा ११ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
पारनेर, राहुरी, अकोले आणि कर्जत सोसायटीसह दोन महिला राखीव, ओबीसी, शेतीपूरक, अनुसूचित जाती-जमाती आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातील जागांवर निवडणूक रंगणार आहे.
उमेदवार आणि त्यांच्या यंत्रणांनी यादीनुसार मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. दिवाळीचे औचित्य साधून मतदारांसाठी ‘मिठाई’ची खोकी तयार केली जात असल्याचे समजते.
शिर्डीतून ‘सहकार’ची रणनीती!
प्रस्थापितांच्या सहकार पॅनलच्या प्रमुख नेत्यांची अन् उमेदवारांची महत्त्वाची बैठक शिर्डीतील हॉटेलमध्ये शुक्रवारी पार पडली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख, डॉ. सुजय विखे पाटील या प्रमुख नेत्यांनी प्रचार आणि मतदान कसे घडवून आणायचे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
स्वतंत्र प्रचार करण्यापेक्षा एकत्रित प्रचार करावा, ‘यंत्रणा’ कशी राबवावी, याबाबतही आवश्यक मार्गदर्शन बैठकीत करण्यात आले. बिनविरोध झालेल्या संचालकांवर त्या त्या तालुक्यातून सहकार पॅनलला मतदान घडवून आणण्याची जबाबदारीही देण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. काही ठरावीक पदाधिकाऱ्यांसह नेत्यांकडे तालुकानिहाय जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते.
या बैठकीला आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर, माजी आमदार राहुल जगताप, दत्तात्रय पानसरे, करण ससाणे यांच्यासह विखे-थोरात आघाडीच्या सहकार पॅनलचे सर्व उमेदवार, आजी-माजी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मतदार आणि उमेदवार
राहुरी : १०७ : आ. प्राजक्त तनपुरे विरुद्ध सत्यजित कदम
पारनेर : १०४ : राहुल शिंदे विरुद्ध खा. नीलेश लंके
कर्जत : ७५ : तुषार पिसाळ विरुद्ध ज्योती शिंदे
अकोले : ८५ : संजीवनी शिंदे विरुद्ध आ. किरण लहामटे
शेतीपूरक : ८८४ : आ. आशुतोष काळे विरुद्ध सुधीर म्हस्के
पाच जागांसाठी ३८३७ मतदार
ओबीसी : कारभारी जावळे, जालिंदर वाकचौरे, आदिनाथ हजारे
अनु. जाती-जमाती : वैभव पिचड, प्रशांत लोखंडे
भटक्या विमुक्त : गणपत सांगळे, ऋषिकेश ढाकणे
महिला : अनुराधा नागवडे, संगीता वाघ, हर्षदा काकडे, संध्या महांडुळे, मंजूषा गुंड