Tamasha Artists Financial Crisis: दुष्काळाचा तमाशा कलावंतांनाही फटका; मोहटादेवीच्या चरणी आर्थिक मदतीसाठी साकडे

कार्यक्रमांच्या सुपाऱ्या रद्द, रसिकांचा प्रतिसाद घटला; नियमित मानधन आणि शासकीय मदतीसाठी शांताबाई जाधव यांची मागणी
Lavani
LavaniPudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली असतानाच दुष्काळाच्या झळा आता ग्रामीण लोककलेचे जतन करणाऱ्या तमाशा कलावंतांनाही सोसाव्या लागत आहेत. पावसाअभावी ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल मंदावल्याने तमाशाच्या सुपाऱ्या रद्द होत आहेत, कार्यक्रमांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आणि कलावंतांच्या हाताला काम उरत नाही. अशा संकटाच्या काळात आपल्या कलेचा प्रवास निर्विघ्नपणे सुरू राहावा, रसिकांचा प्रतिसाद मिळावा आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरळीत व्हावा, यासाठी तमाशा कलावंतांनी गुरुवारी मोहटादेवीच्या चरणी साकडे घातले. यावेळी पारंपरिक हजेऱ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला; मात्र कलावंतांच्या चेहऱ्यावर कलेच्या सादरीकरणाचा आनंद असतानाच भविष्याच्या चिंतेची छटाही स्पष्ट दिसत होती.

Lavani
Mula Right Canal Water Wastage: दुष्काळात पाटपाण्याची उधळपट्टी! मुळा उजवा कालव्यातून पाणी वाया

मोहटादेवीच्या यात्रेनिमित्त एकादशीला पालखी सोहळा होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीच्या दरबारात तमाशा कलावंतांसह विविध पारंपरिक लोककलाकार हजेरी लावतात. गडाच्या पायथ्याशी कुस्तीच्या आखाड्यात होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून येणारे तमाशा कलावंत, गोंधळी, डोंबारी, वाघे, बहुरूपी तसेच ताशा-ढोलवादक आपल्या कलेच्या माध्यमातून देवीची सेवा करतात. याच हजेरीपासून त्यांच्या वर्षभराच्या भटकंतीच्या हंगामाला सुरुवात होते.

Lavani
Pathardi Hostel Student Death: पाथर्डीत वसतिगृहातील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

मात्र, यंदा दुष्काळाचे सावट, ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती आणि बदलत्या मनोरंजनाच्या माध्यमांमुळे या पारंपरिक कलेसमोरील आव्हाने अधिक तीव्र झाली आहेत. ऊसतोडणीसाठी मजूर बाहेरगावी गेल्याने तमाशा व्यवसायावर परिणाम जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मोहटादेवीच्या गडावर झालेल्या हजेऱ्यांच्या कार्यक्रमाला यंदा तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला. तरीही उपस्थित रसिकांनी कलावंतांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

ज्येष्ठ तमाशा कलाकार शांताबाई जाधव साक्रापूरकर यांनी मोहटादेवीच्या यात्रेत गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून हजेरी लावत आहेत.कोरोनात तमाशा व्यवसायाला मोठा फटका बसला होता. आता दुष्काळामुळे पुन्हा एकदा कलावंतांवर संकट कोसळले आहे. अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक कार्यक्रम रद्द झाले असून, ठरलेल्या सुपाऱ्याही रद्द केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Lavani
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत थोरात-विखे सहमती एक्सप्रेस; १० जागा बिनविरोध, १० जागांसाठी २६ उमेदवार

मायबाप सरकारने कलावंतांकडे लक्ष द्यावे, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे. आमच्या लेकराबाळांचा विचार करून आम्हाला आधार द्यावा, अशी आर्त विनंती त्यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. तमाशा कलावंतांना आर्थिक मदत व हक्काचे मानधन मिळवून द्यावे, अशी मागणीही जाधव यांनी केली.

एका तमाशा फडात २० नृत्यांगनांसह गायक, वादक, तंत्रज्ञ आणि अन्य कामगार मिळून अनेकजण काम करतात. सुमारे ६० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या व्यवसायाशी जोडलेला असतो. कार्यक्रम मिळाला किंवा नाही, तरी कलाकार व कामगारांना रोजचा खर्च भागवावा लागतो. प्रवास, वाहनांचा खर्च, वाद्यांची देखभाल, पोशाख आणि अन्य खर्चांमुळे आर्थिक ओझे वाढत आहे. अशा परिस्थितीत शासनाने तमाशा कलावंतांसाठी नियमित मानधन, आर्थिक मदत आणि लोककलेच्या संवर्धनासाठी ठोस योजना राबवावी, अशी मागणी कलावंतांकडून होत आहे.

Lavani
Rahul Jagtap Datta Pansare: जिल्हा बँकेच्या राजकारणात राहुल जगतापांची खेळी; प्रतापसिंह पाचपुतेंची माघार!

यंदाच्या हजेऱ्यांच्या कार्यक्रमात शांताबाई जाधव तमाशा मंडळ तसेच स्व. हरिभाऊ बडे यांच्याशी संबंधित ढोलकी सम्राज्ञी शिवकन्या बडे नगरकर तमाशा मंडळाने सहभाग घेतला. शाहीर संभाजी जाधव, राणी बडे यांच्यासह विविध तमाशा मंडळांतील कलाकारांनीही सहभाग नोंदविला. तमाशा कलावंतांसोबतच गोंधळी, डोंबारी, वाघे, बहुरूपी आणि ताशा-ढोलवादकांनी आपली कला सादर करून देवीच्या दरबारात सेवा अर्पण केली.

हजेऱ्यांच्या नियोजनासाठी मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, शशिकांत दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, संदीप घुले, अंकुश ठोंबरे, राजेंद्र सिरसाट आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news