

नगर: जिल्हा बँकेसाठी 850 पेक्षा अधिक उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. जेवढे अर्ज जास्त दाखल होतील, तेवढी बिनविरोधची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे पुढील सुटीच्या तीन दिवसांत दोन्ही बाजूंनी हाल‘चाली’ वाढणार आहेत.
विस्थापितांचा गट तीन दिवसांत प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवाराचा शोध घेऊन सोमवारी त्यांचे अर्ज भरून घेणार आहे. नंतर लगेचच उमेदवार ‘नॉट रिचेबल’ करण्याचे प्लॅनिंग आहे. प्रस्थापितांकडूनही इच्छुकांवर ‘वॉच’ असून, त्यांना सूचक, अनुमोदकच मिळू नये, यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचेही समजते.
दरम्यान, दि. 5 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची मुदत आहे. शुक्रवारी गांधी जयंतीची आणि शनिवारी-रविवारी कार्यालयीन सुट्या आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक झाली. दोन दिवसांपूर्वीच कथित विस्थापित नेत्यांची गुप्त बैठक पार पडली. त्यात खा. लंके यांच्यासह दक्षिणेतील काही बडे नेतेही होते. यात ‘प्रस्थापितांना धडा शिकवायचा’ हा संकल्प केल्याचे समजते. त्यामुळे प्रस्थापितांविरोधात ‘मोट’ बांधली जात असल्याचे आता लपून राहिलेले नाही.
एकूणच, पुढील तीन दिवस हे पॅनल पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उमेदवार तयार करून त्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी यंत्रणा काम करणार असल्याचे समजते.
इच्छुकांच्या संख्येमुळे प्रस्थापित चिंतेत!
बिनविरोध निवडणुकीच्या बैठकीला जरा घाईच झाली, असे आता प्रस्थापितांमधूनच कबूल केले जात आहे. ही बैठक झाली नसती तर उमेदवारी अर्ज विक्रीचा पाऊस पडला नसता. आता 50 टक्के म्हणजे 400 अधिक जरी अर्ज दाखल झाले, तरी बिनविरोध निवडणूक कशी करायची, या चिंतेत अनेकजण दिसतात.
सोमवारी येणार दिग्गजांचे अर्ज
डॉ. सुजय विखे पाटील, शंकरराव गडाख, रत्नमाला लंघे, विवेक कोल्हे, चैताली काळे, स्नेहलता कोल्हे, भानुदास मुरकुटे, अक्षय कर्डिले, सचिन जगताप, प्रताप पाचपुते, प्रा. राम शिंदे, सुजीत झावरे, राहुल शिंदे, डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, अरुण कडू, अमृत धुमाळ आदी प्रमुख नेत्यांचे अर्ज सोमवारी दाखल होऊ शकतात.
गुरुवारी दिवसभरात...80 इच्छुकांचे 109 उमेदवारी अर्ज
जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 80 इच्छुकांनी 109 उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात खासदार नीलेश लंके, आमदार काशीनाथ दाते, आमदार किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले आदींचा समावेश आहे.
अकोल्यातून सोसायटी मतदारसंघात एकाच दिवशी 17 अर्ज आले. दरम्यान, तिसऱ्या दिवशीही 166 अर्ज नेले. त्यामुळे आतापर्यंत 846 अर्ज विक्री झाल्याने इच्छुकांचा ‘बाजार’ भरल्याचे दिसले.
दाते आणि लंके समर्थक समोरासमोर
खासदार नीलेश लंके आणि आमदार काशीनाथ दाते यांनी गुरुवारी निवडणूक अर्ज दाखल केले. त्यानंतर माघारी जाताना दाते आणि लंके समर्थक निवडणूक कार्यालय परिसरात आमने-सामने आले. या वेळी लंके समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या. आमदार दाते यांच्यासमवेत प्रशांत गायकवाड व कार्यकर्ते होते.
अकोलेकरांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनी पाचपन्नास वाहनाच्या लवाजम्यासह येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे शक्तिप्रदर्शन चर्चेचा विषय ठरत आहे. तत्पूर्वी, आमदार किरण लहामटे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह येऊन अर्ज दाखल केला. माजी आमदार वैभव पिचड हे ठरावीक कार्यकर्त्यांसमवेत निवडणूक कार्यालयात पोहचले होते.
पिचड-गायकरांमध्ये अजूनही दुरावा?
गायकर अर्ज भरल्यानंतर बाहेर पडले, त्याच दरम्यान पिचड तेथे पोहचले. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने गायकर पुन्हा निवडणूक कार्यालयात आले. यावेळी कार्यकर्त्यांनीही त्यांना वैभव पिचड यांच्या बाजूची खुर्ची दिली. मात्र, त्यांच्यातील मोजक्या संवादामुळे दहा वर्षांपूर्वीचे हेच ते गायकर-पिचड संबंध का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
देसर्डांचा अर्ज भरायला आ. लंघे सोबत!
‘बिनविरोध निवडणूक करा, पण आता एकाच कुटुंबासाठी नको. सहकारात अभ्यासू अन् कामाची आवड असलेले भरपूर लोक आहेत. त्यांना संधी द्या, आम्ही एका मिनिटात माघार घेऊ, अन्यथा लढा अटळ,’ अशा शब्दात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसर्डा यांनी प्रस्थापितांना आव्हान दिले. विशेष म्हणजे देसर्डा यांचा अर्ज भरताना शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे सोबत होते.
पूर्ण ताकदीने बँक लढणार : खा. लंके
जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार गट पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी जाहीर केले. प्रा. सीताराम काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालयात बैठक झाली. यावेळी अमित भांगरे, अरुण कडू, ऋषिकेश ढाकणे, बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, खा. लंके माध्यमांशी बोलताना म्हणाले, तुम्हाला दिसतं वेगळं, पण आतून वेगळंच चालू आहे. आम्हालाही वाटतं निवडणूक बिनविरोध व्हावी, फक्त एकच अजेंडा चालणार नाही. अध्यक्षपदाचा कोणताही उमेदवार ठरलेला नाही. ती प्रक्रिया पुढे आहे.
गुरुवारी दाखल अर्ज
सोसायटी मतदारसंघ : नगर तालुका- बाळासाहेब हराळ, पाथर्डी- आमदार मोनिका राजळे, कडूचंद शेटे, अकोले- आमदार किरण लहामटे, शरद चौधरी, संजीवनी शिंदे, सीताराम गायकर, बाबासाहेब भोर, रावसाहेब वाकचौरे, कैलास वाकचौरे, वैभव पिचड, विकासराव शेटे, राहुरी- हर्ष अरुण तनपुरे, जामखेड- सचिन घुमरे, माजी संचालक अमोल राळेभात, कोपरगाव- संजय शिंदे, अनिल कदम.
कर्जत- तुषार अंबादास पिसाळ, देविदास देशमुख, मंगेश जगताप, मंजूषा गुंड, ज्योती शिंदे, श्रीरामपूर- करण ससाणे, श्रीगोंदा- राजेंद्र नागवडे, शेवगाव- चंद्रशेखर घुले व राजश्री चंद्रशेखर घुले, पारनेर- गीतांजली उदय शेळके, आमदार काशीनाथ दाते, खासदार नीलेश लंके.
शेतीपूरक मतदारसंघ : आमदार आशुतोष काळे, राजेंद्र नागवडे, गंगाराम धुमाळ, रामदास आंबरे, प्रकाश नाईकवाडी, सदाशिव पोखरकर, रावसाहेब वाकचौरे, अंकुश शेळके.
बिगरशेती मतदारसंघ : राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाईकवाडी, परिघा आरोटे, अविनाश कानवडे, संजय भळगट, नंदकिशोर औताडे, वसंत लोढा, सचिन देसर्डा, जनार्दन पटारे, अशोक थोरे.
महिला राखीव : अनुराधा नागवडे, सुवर्णा लहामगे, संजीवनी शिंदे, सोनल गायकवाड, जयमाला सोले पाटील, रेखा नवले, मंजूषा गुंड, शैलेजा लोटके, संगीता वाघ.
इतर मागासवर्ग : अण्णासाहेब शेलार, शरद चौधरी, करण ससाणे, नितीन खेतमाळीस, अंकुश शेळके, कडूचंद शेटे.
अनुसूचित जाती-जमाती : आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, तुकाराम मेंगाळ, प्रकाश सदाफुले.
विमुक्त जाती-जमाती : ऋषिकेश प्रताप ढाकणे, सुनीता नगरे, अशोक महारनवर, अशोक थोरे.