

नगर: बोल्हेगाव परिसरात रस्त्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये आणि टपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या सहा दारू अड्ड्यावर छापे घालून तोफखाना पोलिसांनी मंगळवारी उद्ध्वस्त केले. याबाबत पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांना गोपनीय माहिती मिळाली होती.
पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रमिला गायकवाड, अंमलदार दिनेश मोरे व हेमंत झिने यांच्या पथकाने बोल्हेगाव येथील गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, बाभळीच्या झाडाच्या आडोशाला, लाकडी टपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापे घातले.
दारू विकणाऱ्या मुख्य आरोपीला जागीच ताब्यात घेतले. त्याने रामभाऊ खलाटे (वय ४२, रा. मोर्यापार्क, बोल्हेगाव) असे नाव सांगितले. झडतीत ५० लिटरचे दोन गावठी दारूचे बॅरल आढळून आले. तेथून सुमारे ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपोवन परिसरात पुन्हा रेड
तोफखाना पोलिसांनी बुधवारी दुपारी तपोवन रोड परिसरात गावठी दारू अड्ड्यांवर छापे घालून टपऱ्या उद्ध्वस्त केल्या. दारू अड्ड्यांवर कारवाई सुरूच राहणार असून, अवैध धंद्यावाल्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.