Rahuri Politics: राहुरीत सर्वच नेते सत्तेच्या ‘एक्सप्रेस’मध्ये; विरोधकांचे अंगण पडले ओस

राहुरी तालुक्याच्या राजकीय पटावर सध्या याच उक्तीची प्रचिती येत आहे.
Rahuri Politics
Rahuri PoliticsPudhari
Published on
Updated on

रियाज देशमुख

राहुरीः राजकारणात कुणी कुणाचा कायमस्वरूपी मित्र नसतो किंवा शत्रूही नसतो. कायमस्वरूपी असते ती केवळ सत्तेची ओढ. राहुरी तालुक्याच्या राजकीय पटावर सध्या याच उक्तीची प्रचिती येत आहे.

एकेकाळी सत्ताधारी- विरोधक अशा दोन स्पष्ट ध्रुवांमध्ये विभागलेले राजकारण आज जवळपास एकाच छत्राखाली एकवटल्याचे चित्र दिसू लागले आहे. परिणामी, राहुरीत विरोधक उरलाचं नाही का, असा प्रश्न केवळ राजकीय वर्तुळातचं नव्हे तर, चहाच्या टपरीपासून गावोगावच्या पारापर्यंत चर्चेचा विषय ठरला आहे.

Rahuri Politics
Farmer Accident Aid Scheme:अपघातग्रस्‍त शेतकरी कुटुंबाला मिळतो आर्थिक दिलासा

एकेकाळी राहुरीच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील सीमारेषा ठळकपणे जाणवत असे. राज्यात कोणाचे सरकार आहे, त्यानुसार तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत असली तरी, विरोधी पक्षाचा झेंडा हातात घेऊन, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारी, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारी नेतृत्वं कायम अस्तित्वात होती.

त्यामुळे सत्तेवर अंकुश ठेवणारी लोकशाहीची दुसरी बाजुही तेवढ्याच ताकदीने उभी राहत असे. माजी खासदार प्रसादराव तनपुरे, स्व. रामदास पाटील धुमाळ, ॲड. सुभाष पाटील, स्व. रावसाहेब साबळे, चंद्रशेखर कदम, स्व. शिवाजीराव गाडे यांची राहुरीच्या राजकारणात स्वतंत्र ओळख होती.

कोणी काँग्रेसमध्ये, कोणी राष्ट्रवादीत, तर कोणी भाजपमध्ये राहून वैचारिक व राजकीय संघर्षाची परंपरा कायम जपली. सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे, निर्णयांना आव्हान देणारे व लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेते तालुक्यात असल्याने राजकारणात चैतन्य होते, मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय प्रवाहाने वेगळीच दिशा घेतली.

माजी मंत्री स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले पोटनिवडणुकीत आमदार झाले. सत्यजित चंद्रशेखर कदम भाजप पक्षाच्या माध्यमातून सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचले. उदयसिंह सुभाष पाटील भाजपमध्ये सक्रिय झाले.

Rahuri Politics
Farm Loan Waiver Scheme: जिल्ह्यातील १.९२ लाख शेतकरी कर्जमाफीला पात्र; सहकार विभागाकडून शासनाच्या पोर्टलवर माहिती जाहीर

अनेक वर्षे विरोधी राजकारणाची धुरा सांभाळणारे प्राजक्त तनपुरे आता विधान परिषदेच्या माध्यमातून सत्ताधारी समीकरणांचा भाग बनले आहेत. पोटनिवडणुकीत सत्तेला आव्हान देणारे रावसाहेब खेवरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे कर्डिले, तनपुरे, कदम, पाटील, खेवरे अशा तालुक्यातील प्रभावी राजकीय चेहऱ्यांची आजची राजकीय दिशा सत्तेकडे झुकलेली दिसत आहे.

सत्तेच्या विस्तीर्ण वर्तुळात सर्वच प्रभावी नेतृत्व सामावल्याने विरोधी राजकारणाची जागा दिवसेंदिवस अरुंद होत चालल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) काही मोजक्या कार्यकर्त्यांपुरताचं मर्यादित राहिल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे गटाची ताकदही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

काँग्रेसचे संघटनही पूर्वीप्रमाणे सक्षम व प्रभावी दिसत नाही. परिणामी, महायुतीसमोर खंबीरपणे उभा राहणारा पर्यायी राजकीय पर्याय राहुरीत उरला आहे का, हा प्रश्न अधिक गडद होत आहे.

दरम्यान, राहुरीतील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याभोवती घडलेल्या घटनाक्रमांचीही मोठी चर्चा सुरू आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पक्षाला मिळालेल्या कथित मूक पाठिंब्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर अल्पावधीतचं विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याने या घडामोडींकडे बदलत्या सत्तासमीकरणांच्या नजरेतून पाहिले जाऊ लागले.

या प्रक्रियेची चाहूल यापूर्वीचं लागली होती. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष तथा, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व संचालक मंडळाने अजित पवार गटाची वाट धरली. देवळाली प्रवरातील गणेश भांड व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांनीही शिंदे सेनेच्या राजकीय छत्रछायेत स्थान मिळविले. राजकीय विश्लेषकांच्या मते, या घडामोडी सत्तेच्या प्रवाहाशी जुळवून घेण्याच्या नव्या राजकीय वास्तवाचे प्रतीक मानल्या जात आहेत.

याचदरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाक्‌चौरे यांनीही उद्धव ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठबळ देत नवे, राजकीय समीकरण स्वीकारले.

त्यानंतर ठाकरे गटाचे निष्ठावंत, शाखाप्रमुख ते जिल्हाध्यक्ष असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केलेले पहिलवान रावसाहेब खेवरे यांच्या राजकीय भूमिकेनेही नव्या चर्चांना उधाण आले आहे. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

सक्षम विरोधी चेहरा मिळणार का?

राहुरी तालुक्यातील बहुतांश प्रभावी राजकीय नेते भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या सत्ताधारी आघाडीतील पक्षांमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे विरोधात आता उरले तरी कोण, अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये रंगली आहे. सत्तेला प्रश्न विचारणारा, जनतेच्या समस्या सभागृहापासून रस्त्यापर्यंत नेणारा आणि पर्यायी राजकीय नेतृत्व उभे करणारा, सक्षम विरोधी चेहरा राहुरीला लाभणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राजकीय रंगमंचावर सत्तेचे दिवे

राहुरीच्या राजकीय रंगमंचावर आज सत्तेचे दिवे अधिक तेजाने झळकत आहेत, मात्र लोकशाहीचा आत्मा जिवंत ठेवणारा विरोधी आवाज मंदावत आहे. हा प्रवाह आणखी वेग घेणार की, मतदारचं नव्या समीकरणांना धक्का देणार, याचे उत्तर येणारा काळचं देणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news