

चिंचपूर पांगुळ: पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे दरोडा टाकून लुटणारी बदाम गँग 48 तासांत पकडण्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीकडून 10 दरोडे, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 10 लाख 71 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बदाम कडू काळे (वय 22, रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), साईनाथ विष्णू चव्हाण (वय 22, रा. मुडदे वडगाव, ता. गंगापूर), ऋतिक हसमुख चव्हाण (वय 20), महेश ऊर्फ उमेश नंदू काळे (वय 20, दोघे रा. खोसपुरी, ता.जि. अहिल्यानगर), भैया कडू काळे (वय 20), लाकर करमत काळे (वय 26, दोघे रा. शेकटा, ता. गंगापूर) अशी पकडलेल्यांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगांज, शाहिद शेख, श्यामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल तकर, साखरे साखरे, प्रशांत राठोड, बाळासाहेब सागरखेडकर, मांडगे, वंदना मोढणे, चालक महादेव भांड, भगवान धुळे आदींनी ही कारवाई केली.
चिंचपूर येथे 18 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दगडू भीमराव बडे यांच्या घरी 6 जणांनी दरोडा टाकला व एकूण 1 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने निरीक्षक कबाडी यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी रवाना केले.
हा दरोडा रेकार्डवरील आरोपी बदाम काळे याने साथीदारांसह केल्याचे व तो सध्या साथीदारांसह मजले चिंचोली गावाच्या शिवारातील संजय आव्हाड यांच्या वस्तीवरील घरात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ मजले चिंचोली शिवारात संजय आव्हाड यांच्या वस्तीवर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी बदाम काळे याने चौकशीत साथीदारांसह दरोडा टाकल्याचे कबूल केले. ताराचंद विरुपण भोसले (रा. गाजगाव, ता. गंगापूर), बोट्या उषा भोसले (रा. अंतापूर, ता. गंगापूर), तिरंगा कडू काळे हे पसार आरोपी सोबत असल्याचे त्याने सांगितलेे. पोलिसांनी ताब्यातील आरोपींना संजय भागचंद आव्हाड (वय 50, रा. आव्हाडवस्ती, मजले चिंचोली) यांनी आश्रय दिल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
भेंड्यातील दरोड्याचीही कबुली
तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील निवृत्त नायब तहसीलदार मच्छिंद्र यशवंत बर्डे यांच्या वस्तीवर 10 मार्च रोजी याच टोळीने दरोडा टाकल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तेथे 31 हजार 200 रुपयांसह सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले होते.