

नगर: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने शहरात रविवारी (दि. 15) तब्बल बारा ठिकाणी छापे टाकून विविध कागदपत्रे, डाटा आणि शस्त्रे जप्त केली. काही तरुण कट्टरवादी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुकुंदनगर भागात दहा ठिकाणी आणि तपोवन रोड व कोठला परिसरात प्रत्येकी एका ठिकाणी छापे टाकून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पहाटे तीनच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई दिवसभर सुरू होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की राज्याच्या विविध भागांतील काही तरुण देश-विदेशातील कट्टरवादी संघटनांशी संबंधित वा संपर्कात असल्याची माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. या पथकाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी पुणे, मुंबई तथा विविध शहरांतून खासगी वाहनांनी अहिल्यानगर शहरात आज पहाटे तीनच्या सुमारास प्रवेश केला.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाच वेळी मुकुंदनगर भागात दहा ठिकाणी आणि तपोवन रोड व कोठला परिसरात प्रत्येकी एका ठिकाणी घरांमध्ये छापे टाकण्यात आले. या सर्व ठिकाणी वा घरांमध्ये वापरात असलेले मोबाईल आणि लॅपटॉपमधील डाटा तपासण्यात आला. तसेच या सर्व ठिकाणांहून काही संशयास्पद कागदपत्रे आणि पुस्तकेही जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुप्ती-चाकू, तलवारी जप्त
छापे टाकलेल्या सर्व ठिकाणांहून दहशतवाद विरोधी पथकाने गुप्ती, चाकू व तलवारींसह एकूण आठ हत्यारे जप्त केली. ही हत्यारे बाळगल्याबद्दल भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अमिर हमजा जफर शेख (वय 21) आणि असद जुबेर सय्यद (रा. मुकुंदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पथकाने दोन जणाना ताब्यात घेतल्याचे समजते.
एक आरोपी पसार झाल्याचेही सांगण्यात येत असून, पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुकुंदनगर भागातूनच आणखी काही शस्त्रे पोलिसांनी जप्त केल्याचे आणि त्याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.