

नगर: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा पूर्ण राज्यावर ठसा उमटला आहे. त्यांच्या निधनाच्या धक्यातून अजूनही राज्य सावरलेला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच्या अगोदरच्या दिवशी त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती. सत्तेत राहिलेले व सत्तेच्या बाहेर गेलेले अजितदादा मी जवळून पाहिले. आपल्या नगर जिल्ह्यावरही त्यांची विशेष मेहेरनजर होती, अशा कर्तृत्व संपन्न, नि:स्वार्थपणे मैत्री जपणारा, सुख दुखांच्या प्रसंगांना सर्वांना बरोबर घेणारा नेता आज आपल्यातून गेला आहे, अशा भावना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त करून स्व.अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.
येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी या शोकसभेस उपस्थिती लावून स्व.अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह उपस्थित नेत्यांनी स्व.अजितदादा पवारांच्या अस्थी कलशास व प्रतिमेस आदरांजली वाहिली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार हेमंत ओगले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे उपस्थित होते.
मंत्री विखे म्हणाले, आमच्यात पुष्कळसा कटुता व संघर्ष राहिला आहे. पण एकदा मैत्री जमली कि सर्व काही होते. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आमच्या परिवाराबाबत कायम स्मरणात राहील अशी भूमिका मांडल्याची आठवण करून दिली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, अवघा महाराष्ट्र नाहीतर देश स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनाने हळहळला आहे. सहकार क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांची त्यांना इत्यंभूत माहिती असे. एखाद्या कारखान्यात खट वाजले तरी त्यांना कळे. हीच स्थिती सर्व जिल्हा बँका व बाजार समितीबाबत होती. माझा व त्यांचा पक्ष वेगळा असला तरी कायम आम्ही बरोबर राहिलो. त्यांनी जेव्हा जेव्हा कटू निर्णय घेतले तेव्हा तेव्हा त्यांनी जनहितालाच प्राधान्य दिले व ते ठामपणे बोलून दाखवले. असा स्पष्टोक्ता, निर्णयक्षम व अष्टपैलू असलेले अजित पवारांसारखे नेतृत्व तयार होण्यास वर्षानुवर्षाची प्रक्रिया लागते, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, शेवगाव-पाथर्डी मतदार संघासाठी अजितदादा यांनी कायम मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले. मी जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष असतानाही त्यांनी मला मोठे सहकार्य केले आहे. त्यांचा वक्तशीरपणा, संकट काळात धावून जाणे, स्वच्छता हे गुण शिकण्यासारखे आहेत. गोरगरिबांच्या तारणहार आज त्यांच्या रूपाने गेला आहे.
आमदार काशिनाथ दाते म्हणाले, विकास कामांमध्ये कधीही राजकारण न आणणारे व्यक्तिमत्व अजितदादा होते. 2024 च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःहून मला उमेदवारी दिली व निवडून आणले.
आमदार आशुतोष काळे म्हणाले, कोपरगाव तालुक्याच्या विकास कामांसाठी मोठा निधी देत त्यांनी विकासात मोठे सहकार्य केले. कायम मार्गदर्शन व योग्य सल्ला मला दिला. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे कामे त्यांनी प्राधान्याने केली.
आमदार हेमंत ओगले म्हणाले, माझ्यासारख्या नवख्या आमदारांना त्यांची वागणूक व व्यक्तीमत्व हे खूप प्रभावित करणारे होते. ते खऱ्या अर्थाने सर्वांचे दादा होते. आमदार विठ्ठल लंघे म्हणाले, राज्यात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडून त्यांनी वेगाने विक्रम केला आहे. त्यांच्याकडे काम घेऊन गेल्यावर त्यांनी तत्काळ स्पष्टपणे निर्णय घेत मार्गी लावली.
याप्रसंगी अशोक सावंत, शशिकांत गाडे, सचिन गुजर, भानुदास मुरकुटे, दादा कळमकर, नरेंद्र घुले, राजेंद्र फाळके, अण्णासाहेब मस्के, माधवराव कानवडे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. आमदार संग्राम जगताप यांनी कृतज्ञता व्यक्त केली.