

नगर: जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभुमीवर शासनाच्या आदेशान्वये संवर्ग 1 मधील दुर्धर आजार असलेले 348 आणि दिव्यांग 319 अशा 667 गुरुजींच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रशासनाने हालचाली वाढवल्या आहेत.
दिव्यांग व दुर्धर आजारांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून तपासणी केली जाणार आहे, तर घटस्फोटीत, परितक्त्यांची थेट गावात जाऊन पडताळणी होणार आहे. येत्या आठवडाभरातच ही तपासणी सुरू होणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजले. (Latest Ahilyanagar News)
जिल्हा परिषदेच्या गुरुजींच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र संवर्ग एकमधील बदल्यांमध्ये काही शिक्षकांकडून प्रमाणपत्रांचा गैरवापर होऊन मूळ लाभार्थींवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी येत असतात. या अनुषंगाने शासनाच्या ग्रामविकास विभागाने 15 जून 2025 रोजी आदेश काढून संवर्ग एकच्या पडताळणीबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने संवर्ग एकमध्ये बदलीसाठी इच्छूक असलेल्या 667 गुरुजींच्या प्रमाणपत्र पडताळणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, संवर्ग एकमध्ये दुर्धर आजार, यात पक्षघात, कर्करोग, मेंदुचे विकार, थायलेसिमया इत्यादी आजाराचे 348 गुरुजी आहे. तर दिव्यांगात 319 गुरुजींचा समावेश असून, यात कर्णबधीर गुरुजींची संख्याही लक्षणीय असल्याचे समजते.
या गुरुजींची दिव्यांग, घटस्फोटीत, परितक्त्या, तसेच मतिमंद व गंभीर आजारी मुलांचे पालक शिक्षण विभागाने संबंधित गुरुजींच्या नावाची यादी पुढे पाठवली आहे. त्यावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांना पत्र पाठवून वैद्यकीय तपासणी करण्याबाबत नियोजन करणार आहेत, त्यामुळे या पडताळणीमध्ये नेमके काय पुढे येणार, याची जिल्ह्यातील 11 हजार गुरुजींना उत्कंठा असणार आहे.
दरम्यान, 2022 च्या बदल्यांवेळीही साधारणतः 550 गुरुजींची ससून रुग्णालयातून तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर काही शिक्षक कोर्टात गेल्याचेही दिसले होते. त्यामुळे त्याचा अहवाल समोर आला नसल्याने या तपासणीकडे नजरा असणार आहेत.
घटस्फोटितांची त्रयस्थ समितीकडून पडताळणी
संवर्ग एकमधील घटस्फोटीत व परितक्त्या 60 महिला शिक्षकांच्या गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. त्यासाठी पाहणी करणार्या समितीत शिक्षण विभाग सोडून त्रयस्थ विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचेही समजते. तशा सीईओंकडून गटविकास अधिकार्यांना सूचना असल्याचीही माहिती पुढे येत आहे.
जिल्हा रुग्णालय आपलेच प्रमाणपत्र तपासणार?
बहुतांश शिक्षकांना जिल्हा रुग्णालयातूनच संवर्ग एकमधील आजार, दिव्यांगात्वाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. आता त्याची पडताळणीची जबाबदारीही त्यांच्याकडेच देण्यात आल्याने याबाबत संभ्रम वाढला आहे. त्यामुळे ही तपासणी ससून किंवा अन्य रुग्णालयातून व्हावी, असाही सूर कानावर येत आहे.