

Fake doctors caught in Nagar
नगर: वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर शस्त्रक्रिया करणार्या, अॅलोपॅथीची औषधे देणार्या तिघा बोगस डॉक्टरांचे बिंग महापालिकेने छापेमारीत फोडले. तिघाही बोगस डॉक्टरांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
पिंजारगल्ली येथील डॉ. ठाकूर क्लिनिकवऱ ही कारवाई करण्यात आली. ओम संतोष ठाकुर, मृत्युंजय धनंजय हालदार व त्यांचा मुलगा संजय मृत्युंजय हालदार (तिघेही रा. पिंजार गल्ली, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Latest Ahilyanagar News)
वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना बेकायदेशीरपणे रुग्णांची तपासणी करून उपचार व शस्त्रक्रिया करत असल्याची माहिती आरोग्य सेवा रुग्णालय (राज्यस्तर) मुंबई येथून महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बाबासाहेब बागल, वैद्यकीय सहायक डॉ. कविता गणेश माने, मुख्य लिपीक सचिन अरुण काळभोर, वरिष्ठ परिचारिका स्नेहलता संजय पारधे-क्षेत्रे यांना तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
डॉ. बागल यांच्या पथकाने 1 एप्रिल रोजी पिंजारगल्ली येथे जाऊन दोन्ही क्लिनिकवर छापा टाकला. यावेळी संशयित बोगस डॉक्टर रुग्णांची तपासणी व उपचार करताना आढळून आले. तेथील रुग्णांकडे चौकशी केली असता, संशयित बोगस डॉक्टरांनी त्यांच्यावर मूळव्याध, भगंदर, फिशर आजारांवर शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले.
पथकाने त्यांच्याकडे वैद्यकीय पदवीची मागणी केली असता, त्यांनी नॅचरोपॅथी, इलेक्ट्रॉपॅथी अशा डिप्लोमा कोर्सेसची प्रमाणपत्रे दाखवली. वैद्यकीय पदवीबाबत, अॅलोपॅथी उपचार, शस्त्रक्रियाबाबत कोणतीही पदवी दाखवली नाही. त्यानंतर डॉ. बागल यांच्या पथकाने रीतसर पंचनामा करून अहवाल सादर केला. त्यानुसार प्राथमिक तपासणीनुसार तिघा बोगस डॉक्टरांवर कोतवाली पोलिस ठाण्यात महानगरपालिकेच्यावतीने डॉ. बागल यांनी फिर्याद दाखल केल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.