

Cyber police investigation in Shingnapur
सोनई: शिंगणापूर येथील बनावट अॅप संदर्भात शिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपासी अधिकार्यांनी शिंगणापुरात धाव घेत चौकशी केली. सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी शिंगणापूर देवस्थानला भेट देत तेथील सीसीटीव्ही आणि कागदपत्राची पाहणी केली.
आमदार विठ्ठलराव लंघे व आमदार सुरेश धस यांनी शिंगणापूर येथे देवस्थानचे नाव वापरून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेत लक्षवेधीद्वारे केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास उत्तर देताना अॅप घोटाळ्यावर कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर लगेचच पोलिस फिर्यादी होत गुन्हा दाखल झाला. (Latest Ahilyanagar News)
शनिदेवाची पूजा, अभिषेक व तेल अर्पण संदर्भात खोटा मजकूर ऑनलाईन पसरवला व भाविक व देवस्थानची फसवणूक केल्याप्रकरणी पाच अॅपधारक व साथीदारावर शिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर सायबर शाखेने फिर्याद दिली आहे.
बनावट अॅपधारक व त्यांचे साथीदारांनी ऑनलाईन दर्शन, पूजा, अभिषेक, तेल चढावा बुकिंग करीता शनैश्वर देवस्थान व धर्मदाय आयुक्त यांची कोणतीही परवानगी न घेता भाविकांकडून ऑनलाईन पद्धतीने अनियमित दराने स्वतःच्या फायद्यासाठी रकमा स्वीकारल्या होत्या. त्यामुळे अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवार सकाळीच सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक तपासी अधिकारी पेंदाम हे शिंगणापूर येथे पोहचले. अॅपसंदर्भातील माहिती, सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून देवस्थान अधिकार्यांकडून कागदपत्रांची माहिती घेतल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
घोटाळा नक्की किती कोटींचा
देवस्थानचा पूर्ण वर्षांचा टर्नओव्हर सुमारे 35 कोटींचा असल्याची चर्चा आहे. परंतू अॅपच्या घोटाळ्याचे आकडे 100 ते 500 कोटींचे घोटाळा असल्याचे आरोप होत आहे. आता गुन्हा दाखल झाल्याने चौकशीत पूर्ण सत्य बाहेर येणार असल्याची आशा शनिभक्तांना आहे.
तपास लवकरच पूर्ण होणार असून गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले जाईल. टेक्निकल तपास चालू असल्याने याची माहिती देता येत नाही.
- मोरेश्वर पेंदाम, पोलिस निरीक्षक, सायबर शाखा.