

नगर/जामखेड: काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशनिंगच्या 400 गोण्या तांदूळ गुन्हे शाखेने छापा टाकत जप्त केल्या आहेत. जामखेड-करमाळा रोडवर जामखेड येथे गुरूवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
सुंदर बबन घुमरे (रा.लोणी, जामखेड) आणि योगेश मोहन भंडारी या दोघांविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Ahilyanagar News)
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना खबर्याकडून रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. जामखेड ते करमाळ रोडने मालमोटारीतून शयितरित्या दिसला.
पोलिस पथकाने त्यास जामखेड आयटीआय येथे अडविले. वाहनाची तपासणी केली असता ट्रकमधील गोण्यामध्ये तांदुळ मिळून आला.वाहन चालक घुमरे याच्याकडे विचारपूस करता मालमोटार स्वत:ची असल्याचे त्याने सांगितले. जामखेडमधील योगेश मोहन भंडारी याच्या दुकानातून तांदळाच्या गोण्या घेतल्या.
तांदूळ रेशनचा शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील असून तो विक्रीसाठी सांगली येथे घेऊन जात असल्याची कबुली दिली. मालमोटार, तांदूळ असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जामखेड पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.