दत्तक पालक मेळावा : कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून घ्यावे दत्तक मूल

नाशिक : दत्तक पालक मेळाव्यात सहभागी झालेले पालक. दुसर्‍या छायाचित्रात मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्य दत्तक समन्वयक राहुल जाधव आणि व्यासपीठावरील पदाधिकारी.
नाशिक : दत्तक पालक मेळाव्यात सहभागी झालेले पालक. दुसर्‍या छायाचित्रात मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्य दत्तक समन्वयक राहुल जाधव आणि व्यासपीठावरील पदाधिकारी.
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निर्मितीतूनच आविष्कार होणे हा सृष्टीचा नियम आहे आणि हा आविष्कारच वंदनीय ठरतो. कुठलीही सुंदर गोष्ट होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळेच कायदेशीर नियमांचे पालन करूनच मूल दत्तक घ्यावे, असे आवाहन दत्तक पालक मेळाव्यात करण्यात आले. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक 1, 2 व मालेगाव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती व आधाराश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दत्तक महिना – 2022 च्या निमित्ताने अशोक स्तंभ येथील आधाराश्रमात हा मेळावा पार पडला.

पालकांमध्ये दत्तक अपत्य घेण्याबाबत असलेले संभ्रम, समस्या व त्यावरील उपाययोजना यासाठी शनिवारी (दि. 26) घेण्यात आलेल्या दत्तक-पालक मेळाव्यात मूल घेतलेले पालक व इच्छूक पालक यांचा स्नेहमिलन कार्यक्रम झाला. त्याचप्रमाणे दत्तक पालकांनी मिळून पालक परिवार संस्था नावाचा दत्तक पालकांचा सपोर्ट समूह तयार केलेला असून, या नोंदणीकृत समूहाचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. मेळाव्यानिमित्त शहराबरोबरच आता ग्रामीण भागामध्येसुद्धा जनजागृतीसाठी शिबिर राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवलेकर, बालकल्याण निर्णायक समिती सदस्य भगवान येलमामे, मुख्य दत्तक समन्वयक राहुल जाधव, सचिव हेमंत पाठक, पालक परिवार समूहाचे अध्यक्ष शिरीष भालेराव, सामाजिक कार्यकर्ते तुषार निकम, तृप्ती मकवाना, दीपाली पालेकर, प्रणाली पिंगळे यांचे सहकार्य लाभले.

दत्तक पालकांशी साधलेला सुसंवाद…
दत्तक मूल घेण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्नात होतो. त्याप्रमाणे दत्तक प्रणालीद्वारे नंबर लागला. जेव्हापासून बाळ घरी आले आहे तेव्हापासून जीवन आनंदी झाले आहे. – योगेश जैन.

सिंधूताई यांच्या कार्यक्रमातून प्रेरित होऊन एक आशा मिळाली. कोरोना कालावधीमध्ये बाळाच्या प्रतीक्षेत खूप वेळ निघून गेला होता. त्यामुळे पुन्हा प्रयत्न केल्यानंतर अवघ्या महिनाभरातच 'कारा' कडून मेल मिळाला आणि चार महिन्याचे इवलीशी पावले आमच्या घरी आली. नातेवाईक, संस्थेच्या मनोबलामुळे आनंद मिळाला. घरच्या सर्व सदस्यांनी आनंदाने नवीन बाळाच्या आगमनासाठी घराची केलेली सजावट पाहून मन आनंदीत झाले. त्यामुळे इच्छुक पालकांनी एक पाऊल उचला, नाव नोंदणी करा. बघा घर कसं आनंदाने भरून जाईल. – अजय बोरे.

आधाराश्रम आणि 'कारा' संस्थेकडून वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि काउन्सलिंग झाले. खरं तर बाळाने आम्हाला आई वडील म्हणून दत्तक घेतले आहे. त्याच्यामुळे घरातील न बोलणारी व्यक्ती बडबडगीते गायला लागली आहेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा त्यांच्या मागे दुडूदुडू धावायला लागली आहेत. घरात खूप उत्साह आणि आनंद आहे. त्यामुळे बाळ घेताना त्यासाठी मानसिक पूर्वतयारी करा. हे नाते खूपच सुंदर आहे. पालक होण्यासाठी सगळ्या दृष्टीने सक्षम असायला हवं. बाळ घरी आल्यानंतर जीवन खूप सुंदर वाटायला लागलं आहे.
– रेश्मा खोचे

बाळ घेण्याबाबत काहीच पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे 'कारा'वर नोंदणी केल्यानंतर दर शुक्रवारी अकरा वाजता मेल चेक करणे, नंबर कुठपर्यंत आला आहे ते चेक करणे सुरू होते. या सर्व प्रोसेससाठी आधाराश्रमाकडून वेळोवेळी हवी ती सगळी मदत मिळाली. त्यांनी पावलोपावली केलेल्या सहाय्याने आज आम्हाला पालक होता आले आहे. घरीसुद्धा आई-बाबा, दीर जाऊबाई अगदी सगळ्यांनीच बाळाचे छान स्वागत केले. – पूर्वा पुराणिक.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news