कोल्‍हापूर : राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत पेपर विक्रेत्याच्या मुलाला सुवर्ण आणि रौप्य पदक | पुढारी

कोल्‍हापूर : राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत पेपर विक्रेत्याच्या मुलाला सुवर्ण आणि रौप्य पदक

कुरुंदवाड; पुढारी वृत्‍तसेवा : येथील पेपर विक्रेत्याच्या मुलाने राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण व रौप्य अशी दोन पदक प्राप्त केली. वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षवर्धन दिगंबर कदम याने 102 किलो वजनी गटात (19) वर्षाखालील स्पर्धेत सुवर्ण तर (21) वर्षाखालील स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले. त्‍याच्या या कामगिरीवर सर्व स्‍तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कुरुंदवाड येथील दिगंबर कदम हे वृत्तपत्र विक्रेते असून दररोज घरोघरी फिरून कुरुंदवाडसह ग्रामीण भागातील गावात वृत्तपत्र वितरणाचे काम करतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. रावेर (ता. जळगाव) येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय युथ ज्युनियर, सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत हर्षवर्धन दिगंबर कदम याने 110 किलो स्नॅच आणि 125 किलो क्लिन आणि जर्क असे एकूण 235 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटाकावले, तर 19 वर्षाखालील गटात रौप्य पदक प्राप्त केले.

हर्षवर्धनला प्रशिक्षक प्रदीप पाटील, विजय टारे, रविंद्र चव्हाण, केदारी गायकवाड, वडील दिगंबर कदम, आजोबा बापूसाहेब कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हर्षवर्धनच्या या यशाबद्दल कुरूंदवाड व परिसरातून त्‍याचे कौतुक होत आहे.

राज्य स्पर्धेत पदक मिळविल्याने आमच्या कष्टाचे चिज झाले. त्‍याच्या कोणत्याही स्पर्धेसाठी कशाचीही कमतरता पडू देणार नाही. त्यासाठी आंम्हाला कितीही कष्ट सोसावे लागले तरी ती सोसण्याची आमची तयारी आहे.

दिगंबर कदम

Back to top button